India vs England Test : कोर्ट केसमुळे दुसऱ्या टेस्टमध्ये बेन स्टोक्स संघाबाहेर

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा असणाऱ्या बेन स्टोक्सला त्याच्यावर सुरू असलेल्या कोर्ट केसमुळे दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी मुकावे लागणार आहे. त्याचसोबत डेविड मलानच्या जागीही युवा खेळाडू ऑली पोप याला संधी देण्यात आली आहे.

Ben-Stokes-court-case
फोटो सौजन्य - क्रोनीकल लाइव्ह

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये पाच टेस्ट खेळवल्या जाणार असून पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला. या विजयात इंग्लंडकडून महत्त्वाची भूमिका बजावणारा बेन स्टोक्स ९ ऑगस्टपासून लॉर्ड्समध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्याला एका कोर्ट केसमुळे या सामन्याबाहेर रहावे लागणार असून त्याच्या जागी इंग्लंडचा दुसरा ऑलराउंडर खेळाडू क्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आले आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एका नाइट क्लबबाहेर झालेल्या मारामारी प्रकरणी बेन स्टोक्सला ६ ऑगस्टला न्यायालयात हजर व्हायचे आहे. त्यामुळे स्टोक्स दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या वोक्सला इंग्लंडने संघात स्थान दिले आहे.

स्टोक्ससोबतच डेविड मलानही सामन्याबाहेर

बेन स्टोक्ससोबतच डेविड मलानही दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. याचे कारण पहिल्या टेस्टमध्ये त्याने कोहलीचे २ झेल सोडले होते. त्यामुळेच त्याला दुसऱ्या टेस्टमध्ये खेळता येणार नाहीये. डेविडच्या जागी युवा फलंदाज ऑली पोप याला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एका पोस्टद्वारे हे बदल जाहीर केले आहेत.

पहिल्या टेस्टमध्ये स्टोक्सची अप्रतिम खेळी

पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बेन स्टोक्सने १४.२ ओव्हरमध्ये फक्त ४० धावा देत चार विकेट आपल्या नावे केल्या. त्याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीची सर्वात महत्त्वाची विकेट बेन स्टोक्सने घेतल्यामुळे सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अप्रतिम खेळ करणाऱ्या स्टोक्सच्या नसण्याने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.

ben stokes
बेन स्टोक्स

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर.

इंग्लंड – जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, किटन जेनिंग्स, जॉनी बेरस्टोव, जोस बटलर, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम करन, मोईन अली, जेमी पोर्टर, क्रिस वोक्स, ऑली पोप.