घरक्रीडारोहितमुळे भारताचा 'सुपर' विजय; तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिकाही जिंकली 

रोहितमुळे भारताचा ‘सुपर’ विजय; तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिकाही जिंकली 

Subscribe

नियमित सामन्याबरोबरच सुपर ओव्हरमध्ये सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्यात भारताला पहिल्यांदाच यश आले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ होती.

हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी २० षटकांत १७९-१७९ धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने टाकलेल्या षटकात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी १७ धावा काढल्या. याचा पाठलाग करतानाटीम साऊथीच्या चांगल्या गोलंदाजीमुळे रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या भारताच्या फलंदाजांना पहिल्या चार चेंडूत केवळ ८ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन चेंडूतजिंकण्यासाठी १० धावांची आवश्यकता होती. रोहितने दोन्ही चेंडूंवर षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

रोहितचे अर्धशतक

तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताचे सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. वेगवान गोलंदाज हमिशबॅनेटने टाकलेल्या डावाच्या सहाव्या षटकात रोहितने २७ धावा चोपून काढत टी-२० क्रिकेटमधील आपले २०वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने आणि राहुलने ८९ धावांची सलामी दिली. मात्र, राहुलला (२७) कॉलिन डी ग्रँडहोमने बाद केले. बॅनेटच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित (६५) माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली (२७ चेंडूत ३८), मनीष पांडे (६ चेंडूत नाबाद १४) आणि रविंद्र जाडेजा (५ चेंडूत नाबाद १०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकांत ५ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

विल्यमसनची झुंजार खेळी  

न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी अवघ्या ५.४ षटकांत ४७ धावांची भागीदारी केली. परंतु, शार्दूल ठाकूरने गप्टिलला ३१ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर मुनरो (१४), मिचेल सँटनर (९) आणि डी ग्रँडहोम (५) यांनाही फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. कर्णधार विल्यमसनने मात्र अप्रतिम फलंदाजी करत २८ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती. शमी टाकत असलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टेलरने षटकार लगावला. मात्र, तिसऱ्या चेंडूवर शमीने विल्यमसनला ९५ धावांवर माघारी पाठवले. यापुढील दोन चेंडूंत एकच धाव काढता आल्याने न्यूझीलंडला एका चेंडूत एका धावेची आवश्यकता होती. या चेंडूवर शमीने टेलरचा त्रिफळा उडवल्याने नियमित सामन्यात बरोबरी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -