घरक्रीडाIND vs ENG : ...त्यावेळी कोणीही खेळपट्टीबाबत तक्रार केली नाही! कोहलीचे टीकाकारांना...

IND vs ENG : …त्यावेळी कोणीही खेळपट्टीबाबत तक्रार केली नाही! कोहलीचे टीकाकारांना प्रत्युत्तर 

Subscribe

खेळपट्टीपेक्षा फलंदाजांच्या तंत्रावर टीका केली पाहिजे, असे कोहलीला वाटते.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत खेळपट्ट्यांबाबत बरीच चर्चा होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांत पहिल्या चेंडूपासूनच फिरकीपटूंना मदत मिळत होती. खासकरून अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला. त्यामुळे मागील दोन सामन्यांच्या खेळपट्ट्यांवर बरीच टीका झाली. परंतु, टीकाकारांनी खेळपट्टीपेक्षा फलंदाजांच्या तंत्रावर टीका केली पाहिजे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीला वाटते. तसेच भारताने न्यूझीलंडमध्ये तीन दिवसांत कसोटी सामना गमावला, त्यावेळी कोणीही खेळपट्टीबाबत तक्रार केली नाही, मग आता का? असा सवालही कोहलीने उपस्थित केला.

मीडियाही खेळपट्ट्यांना दोष देत आहे

खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यास लगेच चर्चेला सुरुवात होते. भारतातील मीडियाने जर फिरकीला मदत मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर टीका करणे का चुकीचे आहे हे दाखवून दिले, तर ही चर्चा दोन्ही बाजूंचा विचार करून होत आहे, असे म्हणता येईल. मात्र, आता भारतातील मीडियाही खेळपट्ट्यांना दोष देत आहे. कसोटी सामना चार-पाच दिवसांत संपला, तर खेळपट्टीबाबत कोणीही काहीच बोलत नाही. परंतु, सामना दोन-तीन दिवसांमध्ये संपला, तर प्रत्येकच जण खेळपट्टी कशी फिरकीला अनुकूल होती याबाबत बोलू लागतो, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

त्यावेळी फलंदाजांच्या तंत्राविषयी चर्चा झाली

आम्ही न्यूझीलंडमध्ये तीन दिवसांत आणि केवळ ३६ षटकांत कसोटी सामना गमावला होता. परंतु, त्यावेळी आपल्या मीडियाने खेळपट्टीबाबत काहीही लिहिले नाही. भारताच्या खेळाडूंनी निराशाजनक खेळ केला असे सर्वांचे म्हणणे होते. त्या खेळपट्टीवर खूप गवत ठेवण्यात आले होते. याचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फायदा झाला. परंतु, त्यावेळी आमच्या फलंदाजांच्या तंत्राविषयी चर्चा झाली. मात्र, आम्ही खेळपट्ट्यांबाबत कधीही तक्रार करत नाही आणि म्हणूनच आमचा संघ इतका यशस्वी ठरला आहे, असेही कोहलीने नमूद केले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -