भारताची विजयी सलामी; दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट राखून मात

Indore T20I: India begin New Year with dominant win over Sri Lanka
भारताची विजयी सलामी; दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट राखून मात

शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांची भेदक गोलंदाजी, तसेच फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट राखून मात केली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

शार्दूलच्या ३ विकेट्स

इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीवीर दानुष्का गुणथिलका आणि अविष्का फर्नांडो यांनी श्रीलंकेच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी ३८ धावांची भागीदारी केल्यानंतर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने फर्नांडोला (२२) बाद केले. तर संयमाने खेळणाऱ्या गुणथिलकाचा २० धावांवर सैनीने त्रिफळा उडवला. यानंतर कुसाल परेराने आक्रमक शैली फलंदाजी करत गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला इतरांची साथ लाभली नाही. परेराने २८ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्यावर चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने बाद केले. पुढे धनंजय डी सिल्वा (१७) आणि वानिंदूं हसरंगा (१६) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या करता आली. त्यामुळे श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद १४२ धावाच करता आल्या. भारताकडून शार्दूलने ३, तर सैनी आणि कुलदीप यांनी २-२ गडी बाद केले.

राहुल, धवनची ७१ धावांची सलामी

रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि शिखर धवन यांना सलामीची संधी मिळाली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९ षटकांतच ७१ धावांची भागीदारी रचली. मात्र, फिरकीपटू वानिंदूं हसरंगाने आधी राहुल (४५) आणि मग धवनला (३२) माघारी पाठवले. यानंतर श्रेयस अय्यर आणि कर्णधार विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत ५१ धावा जोडल्या. अय्यरने २६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्यावर त्याला लाहिरू कुमाराने बाद केले. पुढे कोहली (नाबाद ३०) आणि रिषभ पंतने (नाबाद १) उर्वरित धावा करत भारताला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी