घरक्रीडादुखापतींचे शुक्लकाष्ट! 

दुखापतींचे शुक्लकाष्ट! 

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत मालिकेत दुखापतींनी भारताचा पिच्छा पुरवला आहे. या मालिकेत भारताचे तब्बल ११ खेळाडू जायबंदी झाले आणि यापैकी काहींना मालिकेतून माघार घेणे भाग पडले. इतकेच काय, तर भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तो या दौऱ्यावरही जाऊ शकला नाही. आता बीसीसीआयची मेडिकल टीम आणि फिजिओ यांची कार्यक्षमता, तसेच गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अन्वय सावंत


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बन कसोटीत भारतीय संघाला नवख्या गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागले. या कसोटीत भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली ती मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी. सिराज या कसोटीत भारताचा सर्वात अनुभवी कसोटी गोलंदाज असून त्याने याआधी दोन कसोटी सामने खेळले होते. सैनी आणि शार्दूल यांना केवळ एका कसोटीचा अनुभव, तर नटराजन आणि सुंदर यांचे कसोटीत पदार्पण! त्यामुळे १९३३ पासून म्हणजेच तब्बल ८८ वर्षांतील ही भारताची सर्वात कमी अनुभवी गोलंदाजांची फळी ठरली. मात्र, भारतावर ही वेळ का ओढवली?

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आधी एकदिवसीय आणि टी-२० मालिका झाली. मात्र, हे तर फक्त ‘स्टार्टर’ होते. ‘मेन कोर्स’ म्हणजे कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला आयपीएल स्पर्धेत दुखापत झाली आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली.

भारताने मागील काही वर्षांत परदेशात दमदार कामगिरी केली असून या यशात ईशांत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाने महत्वाची भूमिका बजावली आहे. ईशांत कसोटी मालिकेत खेळणार नाही म्हटल्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराह आणि शमीच्या खांद्यावर होती. या मालिकेतील पहिली कसोटी अ‍ॅडलेड येथे झाली आणि या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची कामगिरी लाजिरवाणी ठरली. भारताचा डाव ३६ धावांत आटोपला, जो त्यांचा कसोटी क्रिकेटमधील नीचांक ठरला. याच डावात फलंदाजी करताना शमीच्या हाताला चेंडू लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मालिकेतून माघार घेणे भाग पडले.

- Advertisement -

ईशांत आणि शमी यांना आधीच दुखापतीमुळे गमावणाऱ्या भारताला मेलबर्न येथे झालेल्या पुढील कसोटीत आणखी एक झटका बसला. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला अखेरच्या दोन कसोटीत खेळता येणार नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे गोलंदाजांना दुखापती होत असताना फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. त्यामुळे सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचे संघात पुनरागमन होणार अशी चर्चा सुरू झाली.

रोहितला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकेल अशी शक्यता वर्णवण्यात येत होती. मात्र, कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांपूर्वी तो पूर्णपणे फिट होईल असे बीसीसीआयच्या डॉक्टरांचे मत असल्याने रोहितला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आले. दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहिल्यावर रोहित तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी भारताला पुन्हा एक झटका बसला. नेट्समध्ये फलंदाजी करताना मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे राहुल मालिकेतून बाहेर झाला.

सिडनी कसोटी भारतासाठी अविस्मरणीय ठरली. ही कसोटी अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने अनिर्णित राखली, अनपेक्षितरित्या! परंतु, तसे करतानाच भारताच्या खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला. पहिल्या डावात अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या डाव्या अंगठ्याला चेंडू लागला. अंगठा फ्रॅक्चर झाल्याने जाडेजा दुसऱ्या डावात खेळू शकला नाहीच, पण त्याला अखेरच्या कसोटीतूनही माघार घ्यावी लागली. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ४०७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताची ५ बाद २७२ अशी धावसंख्या झाली होती.

हनुमा विहारी (१६१ चेंडूत नाबाद २३) आणि रविचंद्रन अश्विन (१२८ चेंडूत नाबाद ३९) यांनी झुंजार फलंदाजी करत जवळपास ४३ षटके खेळून काढली. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. दरम्यान विहारी आणि अश्विन या दोघांनाही दुखापती झाल्या. या सामन्यातच बुमराहसुद्धा जायबंदी झाला. एकाच कसोटीत चार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारताला ब्रिस्बन कसोटीत पाचही नवख्या गोलंदाजांसह खेळावे लागले. परंतु, या दुखापतींमागे कारण काय? याबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दुखापतींसाठी आयपीएल स्पर्धा कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच आता बीसीसीआयची मेडिकल टीम आणि फिजिओ यांची कार्यक्षमता, तसेच गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआय या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि भारताचे खेळाडू लवकरात लवकर फिट होतील, हीच आशा!


हेही वाचा – कसोटीसाठी नवा विचार करण्याची वेळ?


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -