घरक्रीडाIPL 2021 : यंदाच्या मोसमाचे काय वेगळेपण? जाणून घ्या

IPL 2021 : यंदाच्या मोसमाचे काय वेगळेपण? जाणून घ्या

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयला यंदाच्या मोसमाआधी काही नियमांमध्ये बदल करणे भाग पडले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या यंदाच्या म्हणजेच १४ व्या मोसमाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज होणाऱ्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, हा सामना दोन्ही संघांच्या घरच्या मैदानावर न होता चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयला यंदाच्या आयपीएल मोसमाआधी काही नियमांमध्ये बदल करणे भाग पडले असून काही नवे नियम बनवावे लागले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा नेहमीपेक्षा थोडी वेगळी आणि विशेष असणार आहे.

सामने घरच्या मैदानावर नाहीत : यंदाच्या मोसमात कोणत्याही संघाला ‘होम अ‍ॅडव्हान्टेज’ मिळणार नाही, कारण कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. मुंबई इंडियन्सचे पाच सामने चेन्नई, चार सामने दिल्ली, तीन सामने बंगळुरू, दोन सामने कोलकात्यात होणार आहेत. त्यामुळे यंदा सामने अधिक चुरशीचे होतील असे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला वाटते.

- Advertisement -

प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही : मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईत झाली. यंदा मात्र भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी आयपीएल स्पर्धा भारतामध्येच होणार आहे. मात्र, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहेत.

९० मिनिटात इनिंग संपवायची : आयपीएलचे जवळपास सर्वच सामने साडे तीन-चार तास चालायचे. आता मात्र बीसीसीआयने वेळेबाबतचे नियम कडक केले आहेत. आता संघांना एक डाव संपवण्यासाठी ९० मिनिटे मिळणार असून यात दोन ५-५ मिनिटांच्या स्ट्रॅटर्जीक टाईम-आऊटचाही समावेश असणार आहे.

- Advertisement -

सॉफ्ट सिग्नल नाही : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच टी-२० मालिका झाली. या मालिकेतील एका सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवचा इंग्लंडच्या डाविड मलानने झेल पकडला. मात्र, चेंडू मैदानाला लागल्याचे दिसले. परंतु, मैदानावरील पंचांनी सूर्या बाद असल्याचा सॉफ्ट सिग्नल केला होता आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांनीही सूर्याला बाद ठरवले. त्यानंतर विराट कोहली आणि बऱ्याच इतर क्रिकेटपटूंनी या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मैदानात असलेले दोन पंच सॉफ्ट सिग्नल करणार नाहीत.

सुपर ओव्हरसाठी एक तास : दोन डाव संपल्यावर दोन्ही संघांच्या धावसंख्येत बरोबरी असल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येते. सुपर ओव्हरमध्ये सामन्यात बरोबरी कायम राहिल्यास एक संघ जिंकत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातात. यंदा मात्र सुपर ओव्हर संपवण्यासाठी एक तासाचा वेळ असेल. त्यानंतरही दोन्ही संघांमध्ये बरोबरी राहिल्यास संघांना १-१ गुण दिला जाईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -