IPL 2022 Retention : पंजाब किंग्सकडे सर्वाधिक ७२ कोटींची रक्कम शिल्लक; लिलावासाठी दिल्लीकडे सर्वात कमी रक्कम

दिल्लीच्या संघाने आपले खेळाडू रिटेन करताना सर्वाधिक ४२.५ कोटी रूपये खर्च केले आहेत

आयपीएलच्या जुन्या सर्व आठ संघांनी आयपीएल २०२२ ची तयारी सुरू केली आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक संघाची फ्रँचायझी साजेशी रक्कम देऊन खेळाडूंना रिटेन करत असते. मात्र यावेळी सर्व संघांना प्रत्येकी ९० कोटी रुपये देण्यात आले होते. गेल्या वेळी ही रक्कम ८५ कोटी रुपये होती. अनेक संघांनी काही धक्कादायक निर्णय घेतले तर काही संघांनी त्यांच्या चाहत्यांचा कल लक्षात घेऊन खेळाडूंना रिटेन केले आहे. पंजाब किंग्सच्या संघाने कर्णधार के.एल राहुलला रिटेन न केल्याने सर्वांनाच धक्का बसला. तर मुंबई इंडियन्सच्या फँचायझीने पांड्या बंधूना रिटेन केले नाही.

प्रत्येक फँचायझीकडे ९० कोटी रूपये होते

प्रत्येक फँचायझीने खेळाडूंना रिटेन करण्यासाठी किंवा न करण्यासाठी ९० कोंटीमधील निश्चित रक्कम वापरली आहे. काही फँचायझीने ४ खेळाडूंना रिटेन करून आपल्या खात्यातील ४२ कोटींचा वापर केला आहे. दरम्यान तीन खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी ३३ कोटी, २ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी २४ कोटी तर १ खेळाडू रिटेन करण्यासाठी फँचायझीला खात्यातील १४ कोटी वापरावे लागले आहेत. यामध्ये देखील वेगवेगळ्या खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली होती.

४ संघानी ४-४ खेळाडूंना रिटेन केले

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघानी ४-४ खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर हैदराबाद, राजस्थान आणि बंगळुरूच्या संघानी ३-३ खेळाडूंना कायम ठेवले आहे. दरम्यान आतापासून २५ डिसेंबरपर्यंत दोन नवीन संघ लखनऊ आणि अहमदाबादच्या फँचायझींना जुन्या संघानी रिलीज केलेल्या खेळाडूंमधील ३-३ खेळाडू निवडायचे आहेत. त्यानंतर मेगा ऑक्शन होणार आहे. त्याचे आयोजन पुढील वर्षी जानेवारी मध्ये होण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या संघाने सर्वात कमी खेळाडूंना रिटेन केले

पंजाबच्या फँचायझीने सर्वात कमी खेळाडूंना कायम ठेवले आणि फक्त १८ कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच मेगा लिलावासाठी त्यांच्याकडे सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. लिलावासाठी पंजाबच्या संघाकडे ७२ कोटी रुपये असणार आहेत. दरम्यान पंजाबची फ्रँचायझी लिलावात बाकीच्या संघांसाठी अनेक अडचणी निर्माण करू शकते. तर हैदराबादने तीन खेळाडूंना कायम ठेवले आणि २२ कोटी रुपये खर्च केले. लिलावासाठी त्यांच्याकडे ६८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.

दिल्लीच्या संघाने सर्वाधिक रक्कम खर्च केली

चेन्नई, कोलकाता आणि मुंबईच्या संघानी ४-४ खेळाडूंना कायम ठेवले आणि सर्वात जास्त ४२ कोटी रूपये खर्च केले. या संघाकडे ऑक्शनसाठी ४८ कोटी रूपये असणार आहेत. मात्र दिल्लीच्या संघाने आपले खेळाडू रिटेन करताना सर्वाधिक ४२.५ कोटी रूपये खर्च केले आहेत. सोबतच ऑक्शनसाठी सर्वात कमी रक्कम ४७.५ कोटी दिल्लीच्या फँचायझीकडे असणार आहे.


हे ही वाचा: http://IPL 2022 Retention :महागड्या खेळाडूंच्या यादीत या खेळाडूंनी विराटला टाकलं मागे