घरक्रीडाकांगारूंचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश!

कांगारूंचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश!

Subscribe

तिसर्‍या कसोटीत २७९ धावांनी विजयी

मार्नस लबूशेन आणि नेथन लायनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर ४१६ धावांचे आव्हान होते. मात्र, ऑफस्पिनर लायनच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांचा डाव चौथ्या दिवशी १३६ धावांतच आटोपला. लायनने दोन्ही डावांत ५-५ मोहरे टिपण्याची किमया साधली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडला २५६ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २ बाद २१७ धावांवर घोषित केला. त्यांचा सलामीवीर डेविड वॉर्नरने १५९ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद १११ धावांची खेळी केली. त्याला जो बर्न्स (४०) आणि पहिल्या डावातील द्विशतकवीर मार्नस लबूशेन (५९) यांनी उत्तम साथ दिली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दुसर्‍या डावातही फारसा प्रभाव पाडता आला नाही.

- Advertisement -

न्यूझीलंडसमोर चौथ्या डावात ४१६ धावांचे आव्हान होते. याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यांच्याकडून रॉस टेलर (२२) आणि कॉलिन डी ग्रँडहोम (५२) या दोघांनाच २० धावांचा टप्पा पार करता आला. त्यामुळे त्यांचा डाव १३६ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून लायनने ५, तर मिचेल स्टार्कने ३ बळी घेतले. लायनने या सामन्याच्या दोन्ही डावांत मिळून ११८ धावांच्या मोबदल्यात १० गडी बाद केले.

लबूशेन सामनावीर आणि मालिकावीर

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लबूशेनला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील ३ सामन्यांच्या ६ डावांत ९१.५० च्या सरासरीने ५४९ धावा फटकावल्या. यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या लबूशेनने नवीन वर्षाची अप्रतिम सुरुवात केली. न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत त्याने २१५ आणि ५९ धावा केल्या. त्याने आपल्या मागील पाचपैकी चार सामन्यांत शतके केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -