घरक्रीडासिंधू, सायनाचे पहिल्याच फेरीत पॅकअप

सिंधू, सायनाचे पहिल्याच फेरीत पॅकअप

Subscribe

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

विश्व विजेत्या पी.व्ही. सिंधूला कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच सायना नेहवाल आणि जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्‍या साई प्रणितने दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील सामन्याच्या अर्ध्यातून माघार घेतली. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत मनू अत्री आणि सुमित रेड्डी या भारताच्या जोडीवर चीनच्या ह्युआंग काय शियांग आणि लिऊ चेंग या जोडीने रंगतदार सामन्यात १६-२१, २१-१९, १८-२१ अशी मात केली. पुरुष दुहेरीतच सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी हेसुद्धा पराभूत झाला. त्यांनी टाकेशी कामुरा आणि किगो सोनाडा या जपानच्या चौथ्या सीडेड जोडीविरुद्धचा सामना १९-२१, २१-१८, १८-२१ असा गमावला.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या पाचव्या सीडेड सिंधूला अमेरिकेच्या बिवेन झॅन्गने २१-७, २२-२४, १५-२१ असे पराभूत केले. या सामन्याची दमदार सुरूवात करत सिंधूने पहिला गेम २१-७ असा आपल्या खिशात घातला. दुसर्‍या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मात्र, २२-२२ अशी बरोबरी असताना बिवेनने सलग २ गुण मिळवत हा गेम जिंकला. तिसर्‍या गेममध्ये सिंधूला चांगला खेळ करण्यात अपयश आले. तिने हा गेम १५-२१ असा ६ गुणांनी गमावला. त्यामुळे तिचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. मागील महिन्यात जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्‍या सिंधूला मागील आठवड्यात झालेल्या चीन ओपनच्या दुसर्‍याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

- Advertisement -

महिला एकेरीच्याच पहिल्या फेरीत आठव्या सीडेड सायना नेहवालने दुखापतीमुळे अर्ध्या सामन्यातून माघार घेतली. दक्षिण कोरियाच्या किम गा युनविरुद्धच्या सामन्याचा पहिला गेम सायनाने २१-१९ असा जिंकला, तर दुसरा गेम १८-२१ असा गमावला. तिसर्‍या गेममध्ये १-८ अशी पिछाडीवर असताना सायनाला दुखापत झाली आणि तिने सामन्यातून माघार घेतली. सायनाला मागील काही काळात दुखापतींनी सतावले आहे. तिला या मोसमात इंडोनेशियन ओपन ही एकच स्पर्धा जिंकता आली आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सनविरुद्धच्या सामन्यात ९-२१, ७-११ असा पिछाडीवर असताना साई प्रणितचा पाय दुखावला. त्यामुळे त्याने सामन्यात पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला.

पारुपल्ली कश्यप दुसर्‍या फेरीत

- Advertisement -

भारताच्या पारुपल्ली कश्यपने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केली. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात तैवानच्या लू चिया हुंगवर २१-१६, २१-१६ अशी सरळ गेममध्ये मात केली. ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात लूने कश्यपला झुंज दिली. मात्र, दोन्ही गेममध्ये मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत कश्यपने हा सामना जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केली. आता त्याचा दुसर्‍या फेरीत मलेशियाच्या लिव्ह डॅरेनशी सामना होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -