घरक्रीडाबुमराहच्या फिटनेस चाचणीस राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा नकार!

बुमराहच्या फिटनेस चाचणीस राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा नकार!

Subscribe

गांगुली करणार द्रविडशी चर्चा

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागील काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर रहावे लागले आहे. मात्र, नुकतेच त्याने भारतीय संघासोबत पुन्हा सराव केला होता. त्यानंतर त्याची फिटनेस चाचणी घेण्याकरता बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (एनसीए) विचारणा करण्यात आली होती. भारतीय संघात पुनरागमनाआधी त्याने फिटनेस चाचणी देणे अनिवार्य आहे. परंतु, एनसीएने काही कारणांमुळे त्याची फिटनेस चाचणीस नकार दिला. त्यामुळे एनसीए आणि बुमराह यांच्यात वाद असल्याची चर्चा होत आहे. याबाबत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली लवकरच एनसीएचा अध्यक्ष राहुल द्रविडशी चर्चा करणार आहे.

बुमराहच्या फिटनेस चाचणीसाठी एनसीएने का नकार दिला, याबाबतचे कारण मी शोधून काढणार आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी एनसीएचा निर्णय सर्वात महत्त्वाचा मानला जातो. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होऊन आता काही महिनेच झाले आहेत. मी द्रविडसोबत चर्चा करणार आहे. मी याआधीही बर्‍याचदा त्याची भेट घेतली आहे. आम्ही नक्की काय अडचण आहे हे शोधून त्यावर मार्ग काढू. बुमराह मागील बर्‍याच काळापासून जायबंदी आहे. बुमराहला चाचणीसाठी पाठवण्यात आले, त्यावेळी मी बीसीसीआयचा भाग नव्हतो. त्यामुळे नक्की काय घडले हे मला माहित नाही, असे गांगुली शुक्रवारी म्हणाला.

- Advertisement -

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्याआधी झालेल्या भारताच्या सराव सत्रात बुमराहने भाग घेतला होता. मात्र, एनसीएने काही कारणांमुळे त्याची फिटनेस चाचणीस नकार दिला आहे. बुमराह दुखापतीतून सावरत असताना एनसीएमध्ये सराव करण्यास फारसा उत्सुक नव्हता. तसेच त्याने दुखापतीतून बाहेर येण्यासाठी एनसीएमध्ये न जाता इंग्लंडमधील खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यामुळेच एनसीएने त्याची फिटनेस चाचणी घेण्यास नकार दिला, असे म्हटले जात आहे. मात्र, यावर लवकरच तोडगा निघेल अशी हमी गांगुलीने दिली आहे.

क्रिकेट सल्लागार समिती लवकरच निवडणार!

- Advertisement -

क्रिकेट सल्लागार समितीची येत्या काही दिवसांत निवड होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी दिली. ही समितीच नव्या राष्ट्रीय निवड समिती सदस्यांची नेमणूक करणार असून निवड समितीला तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. याआधीच्या क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकांची नेमणूक आधीच केली होती. त्यामुळे नव्या क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक केवळ एका बैठकीपुरतीच असेल, असेही गांगुलीने सांगितले.

धोनीबाबतचा निर्णय तोच घेईल!

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, त्याने काही दिवसांपूर्वीच पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचे भारतीय संघात लवकरच पुनरागमन होईल असे म्हटले जात आहे. याबाबत गांगुलीला विचारले असता त्याने सांगितले, धोनीबाबतचा निर्णय तोच घेईल. तो खूप अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे आपल्यासाठी काय योग्य आहे, हे त्याला नक्कीच ठाऊक असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -