IPL 2023 : कोहलीशी भिडणाऱ्या नवीनवर मुंबईच्या तीन खेळाडूंनी साधला निशाणा

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात काल(बुधवार) रंगतदार सामना झाला. यावेळी मुंबई इंडियन्सने लखनऊवर ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने १८२ धावा करत १८३ धावांचं आव्हान लखनऊला दिलं. परंतु लखनऊला १०१ धावांमध्येच मुंबईने गुंडाळलं आणि क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. दरम्यान, विराट कोहलीशी भि़डणाऱ्या नवीन उल हकला मुंबईच्या तीन खेळाडूंनी निशाणा साधत त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यावेळी नवीन उल हक विराट कोहलीला भिडला होता. त्यानंतर नवीनने आंबा घेऊन सोशल मीडियावर कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु लखनऊची टीम बाहेर गेल्यानंतर आता मुंबईच्या तीन खेळाडूंनी नवीन उल हकला उत्तर दिलं आहे.

सामना संपल्यानंतर संदीप वॉरियर, विष्णु विनोद आणि कुमार कार्तिकेयने नवीनवर निशाणा साधला. तिघांनी टेबलवर आंबा ठेवला आणि नो नॉइजची मुद्रा केली. यात वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. संदीपने पोस्टमध्ये मँगोचा स्वीट सीजन असं लिहिलं होतं. संदीपने नंतर ही पोस्ट डिलीट केली. परंतु ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

एलिमिनेटरच्या सामन्यात नवीन उल हकने ३८ धावात ४ विकेट घेतल्या होत्या. ४ विकेट घेतल्यानंतर त्याने नो नॉइज सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर या तिन्ही खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर नवीनला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नवीन उल हकने एलिमिनेटरच्या सामन्यात रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चार महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं होतं. मात्र, लखनऊची संपूर्ण टीम १६.३ ओव्हर्समध्ये १०१ रन्सवर ऑलआऊट झाली आणि मुंबईने क्वॉलिफायर २ मध्ये प्रवेश केला.


हेही वाचा : IPL 2023 Eliminator : मुंबई आणि लखनऊमध्ये लढत; कोण मारणार बाजी?