घरक्रीडाआमच्या खेळाडूंना भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे

आमच्या खेळाडूंना भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे

Subscribe

विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे मत

सौराष्ट्राचा पराभव करत विदर्भाने सलग दुसर्‍या वर्षी रणजी चषकावर आपले नाव कोरले. विदर्भासाठी यंदाचा रणजी मोसमात बर्‍याच खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. अनुभवी फलंदाज वसीम जाफरने हजार धावांचा टप्पा पार केला, तर त्यांचा कर्णधार फैझ फझल, आदित्य सरवटे, अक्षय कर्नेवार, सतीश या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या खेळाडूंनी मागील वर्षीही चांगले प्रदर्शन केले होते, मात्र त्यांची भारताच्या मुख्य संघात किंवा भारत ’अ’ संघात निवड झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय संघ निवडताना आमच्या खेळाडूंचा विचार झाला पाहिजे, असे मत विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी व्यक्त केले.

आमच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात संधी मिळाली पाहिजे. मागील वर्षी आमचे ७ खेळाडू दुलीप चषकात खेळले. यावर्षी भारतीय संघाच्या निवड समिती सदस्यांनी आमच्या खेळाडूंचा राष्ट्रीय संघ निवडताना विचार केला पाहिजे. आम्ही सलग दोन वर्षे रणजी चषक जिंकलो म्हणजे आमच्या खेळाडूंमध्ये काहीतरी क्षमता असेल. पूर्वी जेव्हा मुंबई, दिल्ली, तामिळनाडू हे संघ चांगली कामगिरी करायचे तेव्हा त्यांच्या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळायची. मला आशा आहे की निवड समिती आमच्या खेळाडूंचाही विचार करेल. भारतीय संघात नाही तर निदान त्यांची भारत ’अ’ संघात तरी निवड झाली पाहिजे. जर त्यांची निवड होत नसेल तर स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्याचा आणि चषक जिंकण्याचा काय फायदा? या स्पर्धेला वेगळा मान आहे. मग त्यात चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंना संधी मिळायला नको का? फक्त आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले तरच भारतीय संघात निवड होते हे योग्य नाही, असे पंडित म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -