घरक्रीडासंभाव्य विनर्स विरुद्ध चोकर्स

संभाव्य विनर्स विरुद्ध चोकर्स

Subscribe

बाराव्या वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत गुरुवारी ओव्हलवर संभाव्य विनर्स विरुद्ध चोकर्स अशी झुंज रंगेल. वर्ल्डकप जेतेपदाने आतापर्यंत इंग्लंडला हुलकावणी दिली असली तरी यंदाच्या स्पर्धेत इऑन मॉर्गनच्या इंग्लंडसंघाकडून जेतेपदाची अपेक्षा केली जात आहे. इंग्लंडच्या सलामीच्या लढतीतील प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला ’चोकर्स’ असे म्हटले जाते. फॅफ डू प्लेसिसचा दक्षिण आफ्रिका संघ चोकर्सचा शिक्का पुसून काढण्यासाठी या वर्ल्डकपमध्ये निश्चित प्रयत्न करेल.

इंग्लंड हे क्रिकेटचे माहेरघर! कसोटी, एकदिवसीय, टी-२० या सार्यांचा उगम आंग्लभूमीतीलच. आयसीसी स्पर्धेत टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद हीच केवळ इंग्लंडची आजवरची कमाई. आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये इंग्लंड अव्वल क्रमांकावर असून त्यांचा प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका तिसर्या क्रमांकावर आहे. रूढीप्रिय ब्रिटीशांनी आयरिश मॉर्गनच्या नेतृत्त्वाखाली खेळताना नवे तंत्र-मंत्र स्विकारले असून त्याची परिणीती रॅकिंगमधील अव्वल क्रमांकात झाली आहे. सुरूवातीपासूनच आक्रमक बाणा अंगिकारण्याची वृत्ती अलिकडे इंग्लंड संघात दिसून येते. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इऑन मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स अशी फटकेबाज फलंदाजांची फळी यजमान इंग्लंडकडे मौजूद असून त्यांना क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, लिआम प्लंकेट, टॉम करन या तेज चौकडीसह मोईन अली आणि आदिल रशीद या फिरकी जोडगोळीमुळे इंग्लंडच्या आक्रमणात विविधता विपुल प्रमाणात दिसून येते.

- Advertisement -

फलंदाजाची भक्कम फळी, मॉर्गनसारखा चतुस्त्र व डावपेचात कुशल कर्णधार, ढगाळ वातावरणात स्विंग, सीम गोलंदाजांचा ताफा, फिरकी दुकली ही इंग्लंडची बलस्थाने. यजमान इंग्लंड संघाचा मोठा दोष म्हणजे सोप्या गोष्टी अवघड करण्याच्या कलेत ते पटाईत आहेत. खेळाचा आस्वाद घेण्याऐवजी अति सावध पवित्रा घेण्याची जुनी खोड इंग्लंडमध्ये प्रकर्षाने दिसून येते.

फॅफ ड्यू प्लेसिसच्या दक्षिण आफ्रिकन संघाला एबी डीव्हिलियर्ससारख्या खमक्या फलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे. दाढीधारी हाशिम आमलासारखा अनुभवी फलंदाज यांच्याकडे असला तरी सध्या त्याचा सूर हरपलेला दिसतो आहे. एकदिवसीय क्रिकेटला साजेशी फटकेबाजी त्याला जमत नाही, तसेच वाढत्या वयाची समस्याही आहेच. ‘असून अडचण नसून खोळंबा’, असेच त्याच्याबाबत म्हणावे लागेल. क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, कर्णधार डू प्लेसिस यांच्यावर द. आफ्रिकन फलंदाजीची मदार असेल.

- Advertisement -

कागिसो रबाडा, लुंगी इंगिडी या तेज जोडगोळीकडे प्रतिस्पर्ध्यांच्या डावाला खिंडार पाडण्याची क्षमता आहे. डेल स्टेनसारखा अनुभवी गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या सामन्याला मुकेल. मात्र, भारताविरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज असेल अशी अपेक्षा द.आफ्रिकन संघाला आहे. प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांच्या मते स्टेनची उणीव त्यांना सध्यातरी जाणवणार नाही. परंतु, स्पर्धेच्या उत्तरार्धात स्टेनसारखी मुलुख मैदान तोफ हाताशी असणे कधीही श्रेयस्कर. खेळपट्टया पाटा असल्यास इम्रान ताहिरसारखा हरहुन्नरी फिरकी गोलंदाज डू प्लेसिसच्या साथीला असेल. हीच त्यांची मोठी जमेची बाजू. नुकत्याच आटोपलेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार्या ताहिरने सर्वाधिक २६ मोहरे टिपून पर्पल कॅपचा मान संपादला होता. कागदावर भक्कम दिसणारा द. आफ्रिकन संघ निर्णायकक्षणी ढेपाळतो अशीच त्यांची आजवरची प्रतिमा. चोकर्स म्हणून त्यांचा नेहमीच उल्लेख करण्यात येतो. यंदा इंग्लंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत ते आपली ही प्रतिमा कायम राखतात का याकडे सार्यांचे लक्ष असेल.

वर्ल्डकपच्या बदललेल्या ढाच्यामुळे काय परिणाम होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लॉर्ड्स, ओव्हल (लंडन), एजबॅस्टन, लीड्स, नॉटिंगहॅम, ओल्ड ट्रॅफर्ड, कार्डिफ, साऊदॅम्पटन, चेस्टर ली स्ट्रीट, एजियस बोल, ब्रिस्टल अशा विविध ११ स्टेडियमध्ये ६ आठवडे वर्ल्डकपची रणधुमाळी चालेल. यजमान इंग्लंडचा संघ आपले ९ सामने विविध मैदानावर खेळेल. इंग्लंडमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उशिरापर्यंत सामने खेळता येतात. यंदा वर्ल्डकपमध्ये ७ सामने विद्युतझोतात (डे-नाईट) खेळले जातील. इंग्लंड, भारत, श्रीलंका या संघांना मात्र दिवस-रात्र सामने खेळावे लागणार नाहीत. न्यूझीलंडला ४ तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यांना ३-३ सामने विद्युत झोतात खेळावे लागतील. उपांत्य झुंजी तसेच अंतिम सामनादेखील दिवसाच खेळला जाईल. यंदाची स्पर्धा तब्बल ४६ दिवस चालेल. त्यात ४८ सामने खेळले जातील. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत हाच ढाचा वापरण्यात आला होता. ९ संघाचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत दोन सामन्यांदरम्यान खेळाडूंना ३-४ दिवसांची विश्रांती मिळेल. भारताची सलामीची झुंज ५ जून रोजी द.आफ्रिकेशी रंगेल. तोपर्यंत इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका या संघाचे २-२ सामने झालेले असतील. बारावी वर्ल्डकप स्पर्धा रंगतदार ठरावी अशी अपेक्षा असून नवा विजेता बघायला मिळतो का याची सार्यांना आता उत्सुकता आहे.

संघ –
इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जेम्स विंस, जो रूट, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, लियम डॉसन, मोईन अली, आदिल रशीद, लिआम प्लंकेट, टॉम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.

द.आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जेपी ड्युमिनी, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी इंगिडी, क्रिस मॉरिस, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, डेल स्टेन, इम्रान ताहिर, रॅसी वन डर डूसेन.

सामन्याची वेळ – दु. ३.०० वाजता
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

– शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -