कोहलीला आऊट करायचं असेल तर…! सकलेन मुश्ताकने सांगितला फंडा!

virat kohli saqlen mushtaq

सध्या जगातला नंबर वन बॅट्समन कोण? असा प्रश्न विचारला, तर १० पैकी ९ जणांच्या तोंडी हमखास येणारं नाव म्हणजे विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणजे भारतीय बॅटिंग लाईनअपचा कणाच मानला जातो. जगातल्या कोणत्याही बॉलरला विराट कोहली खेळू शकतो असं म्हटलं जातं. विराट कोहलीला आऊट करणं म्हणजे बॉलरसाठी महाकठीण कर्मच जणू! पण याच विराट कोहलीला आऊट करण्याचा फंडा आता पाकिस्तानचा सुप्रसिद्ध फिरकीपटू आणि इंग्लंडच्या संघाचा माजी बॉलिंग कोच सकलेन मुश्ताकने सांगितला आहे. हाच फंडा त्याने इंग्लंडच्या बॉलर्सला देखील शिकवला आहे. पण नक्की काय आहे हा फंडा?

एकटा कोहली ११ खेळाडूंच्या बरोबरीचा!

एका ऑनलाईन मुलाखतीदरम्यान सकलेन मुश्ताकने विराट कोहलीच्या बॅटिंगबद्दल आपलं निरीक्षण सांगितलं आहे. सकलेन मुश्ताक म्हणतो, ‘एकटा विराट कोहली ११ खेळाडूंच्या बरोबरीचा आहे. त्याला आऊट करणं म्हणजे आख्ख्या भारतीय टीमला आऊट करण्यासारखं आहे. तो एक कुशल तरबेज खेळाडू आहे. त्याच्या खेळात तो टॉप क्लास आहे. त्याला कोणत्याही स्पिनरला खेळताना अजिबात अडचण येत नाही’, अस मुश्ताक म्हणाला आहे.

कोहलीला आऊट करण्याचा फंडा!

सकलेन म्हणतो, ‘विराट कोहली ताकदीचा बॅट्समन आहे. तुम्हाला त्याला त्याच पद्धतीने पाहावं लागेल. तुम्हाला एक बॉलर म्हणून ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवावी लागेल. पण विराट जरी सर्वोत्तम बॅट्समन असला, तरी तुमच्यासोबत खेळताना दबाव त्याच्यावर असतो, तुमच्यावर नाही. कारण आख्खं जग त्यावेळी विराट कोहलीला पाहात असतं. हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. सर्वोत्तम बॅट्समन असल्यामुळे त्याच्यामध्ये अहंकार असतो. तुम्ही त्याच्याविरुद्ध एक जरी डॉट बॉल टाकला तर त्याचा अहंकार दुखावला जातो. मग तुम्ही त्याला अडकवून आऊट करू शकता. अशा वेळी तो जास्त दुखी होतो. क्रिकेट हा डोक्याने खेळण्याचा खेळ आहे. तुम्हाला त्याच्याविरोधात खेळताना कायम अशा पद्धतीने विचार करावा लागतो’.