शार्दूल ठाकूर होऊ शकेल ‘मॅचविनर’ अष्टपैलू, पण हार्दिकची जागा घेणे अवघड!

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण यांनी शार्दूलचे कौतुक केले. 

shardul thakur
शार्दूल ठाकूर होऊ शकेल ‘मॅचविनर’ अष्टपैलू

शार्दूल ठाकूरमध्ये चांगला अष्टपैलू बनण्याची क्षमता आहे, असे मत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण यांनी व्यक्त केले. भारताकडे रविंद्र जाडेजा, अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे अष्टपैलू आहेत. मात्र, हे तिघेही फिरकीपटू असल्याने भारतीय संघ वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलूच्या शोधात आहे. हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून तो सातत्याने गोलंदाजी करत नाही. त्यामुळे त्याची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात निवड झाली नाही. परंतु, भारताकडे वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून शार्दूलचा पर्याय आहे, असे अरूण यांना वाटते. मात्र, हार्दिकची जागा कोणीही घेणे फार अवघड असल्याचेही अरूण यांनी नमूद केले.

शार्दूलने स्वतःला सिद्ध केले 

चांगले अष्टपैलू शोधणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करणे, हे निवड समितीचे काम आहे. शार्दूलने स्वतःला अष्टपैलू म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्यात चांगला अष्टपैलू बनण्याची क्षमता आहे. त्याने ऑस्ट्रेलियात केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी होती, असे अरूण म्हणाले. शार्दूलला ऑस्ट्रेलियामध्ये एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने  करताना त्याने दोन डावांत मिळून ७ विकेट घेतल्या आणि फलंदाजीत पहिल्या डावामध्ये ६७ धावांची अप्रतिम खेळी केली होती.

हार्दिकची जागा घेणे अवघड

वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू तयार करणे सोपे नाही. त्यामुळे कोणीही हार्दिकची जागा घेणे अवघड आहे. हार्दिक फारच प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र, पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला सतत गोलंदाजी करणे शक्य होत नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत गोलंदाजी केली होती. त्याला विकेटही मिळाल्या होत्या. परंतु, त्याने गोलंदाजी करत राहावी यासाठी आम्हाला त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, असे अरूण म्हणाले.