घरक्रीडास्मिथ, लबूशेनची अर्धशतके

स्मिथ, लबूशेनची अर्धशतके

Subscribe

न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलिया ४ बाद २५७

अनुभवी स्टिव्ह स्मिथ आणि युवा मार्नस लबूशेनच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याची ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ४ बाद २५७ अशी धावसंख्या होती. न्यूझीलंडचा संघ १९८७ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या दिवशीच्या खेळाला ८० हजारांहूनही अधिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. मात्र, दुसर्‍या सामन्यात त्याने पुनरागमन करताना पहिल्याच षटकात सलामीवीर जो बर्न्सला खातेही न उघडता माघारी पाठवले. यानंतर डेविड वॉर्नर आणि पहिल्या सामन्यातील शतकवीर मार्नस लबूशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी दुसर्‍या विकेटसाठी ६० धावांची भर घातली. डावखुरा वेगवान गोलंदाज निल वॅग्नरने वॉर्नरला ४१ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. लबूशेनने मात्र आपला चांगला फॉर्म कायम राखत १३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला स्मिथची उत्तम साथ लाभली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या.

- Advertisement -

कॉलिन डी ग्रँडहोमने लबूशेनचा ६३ धावांवर त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. डी ग्रँडहोमनेच मॅथ्यू वेडला ३८ धावांवर यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद केले. स्मिथने मात्र एक बाजू लावून धरत १०३ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले, जे त्याचे कसोटीतील २८ वे अर्धशतक होते. त्याच्या आणि ट्रेव्हिस हेडच्या संयमी फलंदाजीमुळे न्यूझीलंडला आणखी विकेट्स मिळवता आल्या नाही. त्यामुळे दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ९० षटकांत ४ बाद २५७ अशी धावसंख्या होती. पहिल्या दिवशी स्मिथने १९२ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ७७ धावा आणि हेडने ५६ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : पहिला डाव ९० षटकांत ४ बाद २५७ (स्टिव्ह स्मिथ नाबाद ७७, मार्नस लबूशेन ६३, डेविड वॉर्नर ४१; कॉलिन डी ग्रँडहोम २/४८, निल वॅग्नर १/४०) वि. न्यूझीलंड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -