घरक्रीडाकर्णधाराच्या मताला फारसे महत्त्व नाही!

कर्णधाराच्या मताला फारसे महत्त्व नाही!

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक प्रशिक्षकांचा करार इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर संपुष्टात आला. पण आगामी विंडीज दौर्‍यासाठी बीसीसीआयने त्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर नवा प्रशिक्षक शोधण्याची जबाबदारी कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड या माजी खेळाडूंच्या समितीवर सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौर्‍याला रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीला प्रशिक्षकांबाबत विचारले असता तो म्हणाला, क्रिकेट सल्लागार समितीने मला याबाबत विचारलेले नाही. मात्र, त्यांना माझे मत हवे असल्यास मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगली कामगिरी केली आहे आणि ते प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला नक्कीच आनंद होईल. कोहलीने आपले मत मांडले असले तरी या मताला फारसे महत्त्व दिले जाणार नाही, असे सल्लागार समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

कर्णधार त्याला हवे ते बोलू शकतो. प्रशिक्षक नेमण्यासाठी आमची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे मत बीसीसीआय ग्राह्य धरत असेल, पण आम्ही त्याच्या मताला फारसे महत्त्व देणार नाही. नवा प्रशिक्षक नेमण्यासाठी बीसीसीआयने आम्हाला काही निकष दिले आहेत आणि आम्ही त्यानुसारच काम करू. आम्ही महिला संघाचा प्रशिक्षक निवडण्याआधी कोणाशीही संवाद साधला नव्हता. आता पुरुष संघाचा प्रशिक्षक नेमताना आम्ही कोणतेही पूर्वग्रह ठेवणार नाही. आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेऊ. प्रशिक्षकपदासाठी भारतातून आणि परदेशातून बर्‍याच जणांनी अर्ज केला आहे. त्यामुळे आम्ही विचार करूनच निर्णय घेऊ, असे गायकवाड म्हणाले.

- Advertisement -

नव्या प्रशिक्षकात कोणते गुण असणे महत्त्वाचे आहे, असे विचारले असता गायकवाड यांनी सांगितले, मी याआधी प्रशिक्षक राहिलो आहे. कपिल देवही प्रशिक्षक होता. त्यामुळे प्रशिक्षकात कोणते गुण असायला हवे हे आम्हाला माहित आहे. भारतीय संघाने मागील काही काळात अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, कामगिरीत अजून सुधारणा करण्यासाठी नव्या प्रशिक्षकात व्यवस्थापन, नियोजन आणि खेळाचे ज्ञान हे गुण असणे गरजेचे आहे.

कोहलीला विचारणा झालीच पाहिजे! -गांगुली

- Advertisement -

क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी पुरुष संघाचा नवा प्रशिक्षक निवडताना कर्णधार विराट कोहलीच्या मताला विशेष महत्त्व दिले जाणार नाही असे म्हटले असले तरी भारताचा कर्णधार सौरव गांगुली त्यांच्या मताशी सहमत नाही. तो म्हणाला, विराट भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला प्रशिक्षकांबाबत बोलायचा हक्क आहे. प्रशिक्षक निवडताना त्याचे मत विचारात घेतलेच पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -