या नियमामुळे झाले वृद्धिमानचे पुनरागमन! – प्रसाद

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा

आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा झाली. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाचे जवळपास दीड वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यातून सावरल्यानंतर लगेचच त्याच्या अंगठ्याला आणि नंतर खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला जवळपास वर्षभर मैदानाबाहेर रहावे लागले. यानंतर फिट झाल्यावर तो यावर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा आणि आयपीएलमध्ये खेळला होता. मात्र, या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले. तर द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर त्याने एकही प्रथम श्रेणी किंवा कसोटी सामना खेळलेला नाही. पण असे असतानाही विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

वृद्धिमानची निवड करण्यामागे काय कारण होते असे विचारले असता निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद म्हणाले, एखाद्या सिनियर खेळाडूला दुखापत झाल्यानंतर, तो जेव्हा फिट होईल, तेव्हा त्याला पुनरागमनाची संधी द्यायची हा आमचा एक अलिखित नियम आहे. त्यामुळेच आम्ही वृद्धिमान साहाची कसोटी संघात निवड केली आहे.

वृद्धिमानने आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यांत ३०.६७ च्या सरासरीने ११६४ धावा केल्या आहेत. त्याला कसोटी संघात स्थान मिळाले असले तरी तो राखीव यष्टीरक्षक-फलंदाज असणार आहे. युवा रिषभ पंतने मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली होती. त्यामुळे तो सध्या भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज आहे. आंध्र प्रदेशच्या केएस भरतने स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी सुरु ठेवली, तर लवकरच तो कसोटी संघात येईल असे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वृद्धिमानसाठी ही अखेरची संधी असू शकेल.

पंत भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज

पुढील वर्षी टी-२० विश्वचषक होणार असल्याने रिषभ पंतला आता केवळ कसोटीच नाही, तर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येही जास्तीतजास्त संधी देण्याचा निवड समिती प्रयत्न करणार आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकासाठी सुरुवातीला त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. परंतु शिखर धवनला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी पंतची निवड करण्यात आली. त्याने या स्पर्धेच्या ४ सामन्यांत ११६ धावा केल्या. त्यातच धोनी विश्वचषकानंतर निवृत्त होईल, अशी चर्चा होती. मात्र, त्याने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत एम.एस.के प्रसाद यांनी त्याच्याशी चर्चाही केली. धोनी आणि पंतबाबत प्रसाद म्हणाले की, धोनीसारख्या महान क्रिकेटपटूला कधी निवृत्त व्हायचे हे कळते. विश्वचषकानंतरही आम्ही काही नव्या योजना आखल्या असून रिषभ पंतला जास्तीतजास्तसंधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धोनीने निवृत्ती घेतली नाही, तरी त्याला संघात स्थान द्यायचे की नाही हे निवड समिती ठरवेल.