घरक्रीडाTokyo Olympics : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूची 'रौप्य' कमाई 

Tokyo Olympics : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूची ‘रौप्य’ कमाई 

Subscribe

मीराबाईने ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा २१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. 

भारताचे खेळाडू यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करतील अशी अपेक्षा केली जात आहे. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती, जी भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा मात्र भारत पदकांची दुहेरी संख्या गाठेल अशी अपेक्षा केली जात आहे. भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची दमदार सुरुवात झाली असून स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. या विजयासह मीराबाईने ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा २१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.

 

- Advertisement -

शनिवारी झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले. मीराबाईकडून २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्येही पदकाची अपेक्षा केली जात होती. परंतु, त्यावेळी तिने निराशा केली होती. यंदा मात्र तिने जिद्दीने खेळ करताना कर्णम मल्लेश्वरीचा विक्रम मोडीत काढला. मल्लेश्वरीने २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिले पदक जिंकवून दिले होते.

- Advertisement -

यंदा मीराबाईने एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक पटकावले आणि वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा पदकांचा दुष्काळ संपवला. या स्पर्धेत चीनच्या होऊ झीहोईने स्नॅचमध्ये ९४ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलोचे वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. तसेच तिने या कामगिरीसह ऑलिम्पिक विक्रमही प्रस्थापित केला. इंडोनेशियाच्या ऐसाह विंडी कॅन्टिकने एकूण १९४ किलो वजनाची नोंद करत कांस्यपदक आपल्या नावे केले.

पदक देशाला समर्पित – मीराबाई

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी हे पदक माझ्या देशाला समर्पित करते. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी माझ्या कुटुंबाचे, विशेषतः माझ्यासाठी अनेक त्याग करणाऱ्या आणि कायम मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या आईचे आभार मानते, असे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर मीराबाई चानू म्हणाली. २६ वर्षीय मीराबाईने याआधी जागतिक स्पर्धा, तसेच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी केली आहे.

प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल – पंतप्रधान 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी यापेक्षा चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शकलो नसतो. मीराबाई चानूच्या उत्कृष्ट कामगिरीचा संपूर्ण भारताला आनंद आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या या यशामुळे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाईचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -