घरक्रीडाTokyo Olympics : भारताचे नेमबाज पुन्हा अपयशी; सौरभ-मनू पात्रता फेरीतच गारद

Tokyo Olympics : भारताचे नेमबाज पुन्हा अपयशी; सौरभ-मनू पात्रता फेरीतच गारद

Subscribe

सौरभ-मनूला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भारतीय नेमबाजांकडून यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती. विशेषतः सौरभ चौधरी आणि मनू भाकर या युवा पिस्तूल नेमबाजांना पदकांचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, या दोघांना वैयक्तिक पाठोपाठ मिश्र दुहेरीतही चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र दुहेरीत सौरभ आणि मनू या भारतीय जोडीचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात सौरभ आणि मनूने मिळून ३८० गुण मिळवले. त्यामुळे त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि ते पात्रतेतच गारद झाले.

१० मीटर एअर पिस्तूलच्या पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यातील अव्वल दोन जोड्या सुवर्णपदकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील जोड्यांमध्ये कांस्यपदकाची लढत होते. सौरभ आणि मनू सातव्या स्थानी राहिल्याने त्यांना आगेकूच करता आली नाही. पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या मालिकेत सौरभने ९६ गुण, तर मनूने ९२ गुण मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या मालिकेत सौरभने ९८ गुण, तर मनूने ९४ गुण मिळवले. परंतु, पदकांसाठीच्या सामन्यांना पात्र ठरण्यासाठी ते पुरेसे नव्हते.

- Advertisement -

यशस्विनी-अभिषेक यांनाही अपयश 

त्याआधी सौरभ आणि मनूला पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यात यश आले होते. पहिल्या टप्प्यात या दोघांनी मिळून ५८२ गुणांची कमाई केली होती. इतकेच नाही, तर या टप्प्यात सौरभ आणि मनूची जोडी अव्वल स्थानी राहिली. यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा या जोडीला मात्र १७ व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांचे आव्हान पात्रतेच्या पहिल्याच टप्प्यात संपुष्टात आले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -