Tokyo Olympics : मेरी कोमचे आव्हान संपुष्टात; उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरीला कोलंबियाच्या इंग्रिट वेलंसियाने २-३ असे पराभूत केले.

mary kom
मेरी कोमचे आव्हान संपुष्टात

भारताची आघाडीची बॉक्सर आणि सहा वेळच्या विश्व विजेत्या मेरी कोमचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील आव्हान संपुष्टात आले. तिला उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाच्या इंग्रिट वेलंसियाने २-३ असे पराभूत केले. २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या मेरीला यंदा सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. हे तिचे अखेरचे ऑलिम्पिक असल्याने तिचे सुवर्णपदक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याचे लक्ष्य होते. परंतु, मेरीला गुरुवारी झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

वेलंसियाची आक्रमक सुरुवात

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात वेलंसियाने आक्रमक सुरुवात केली. या लढतीच्या पहिल्या फेरीत वेलंसियाच्या हल्ल्यांचे मेरीकडे उत्तर नव्हते. त्यामुळे मेरीने या लढतीची पहिली फेरी १-४ अशी गमावली. दुसऱ्या फेरीत पुनरागमन करताना तिने ३-२ अशी बाजी मारली. परंतु, तिसऱ्या फेरीतही पंचांनी निकाल पुन्हा मेरीच्या बाजूने दिला. तिने ही फेरीही ३-२ अशी जिंकली. मात्र, दोन फेरी जिंकल्यानंतरही तिने हा सामना गमावला. तीन फेरीनंतर वेलंसियाने ही लढत ३-२ अशा फरकाने जिंकली.