घरक्रीडाकरोनामुळे आयपीएलचे सामने केवळ टीव्हीवर?

करोनामुळे आयपीएलचे सामने केवळ टीव्हीवर?

Subscribe

मुंबईतील सामन्यांच्या तिकीटविक्रीवर बंदी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० स्पर्धा मानली जाते. जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदा चाहत्यांची निराशा होऊ शकेल. करोना विषाणूमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द व्हावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होत आहे. परंतु, ही स्पर्धा रद्द न होता, बंद स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांना केवळ टीव्हीवर सामने पाहून समाधान मानावे लागू शकेल. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या शनिवारी होणार्‍या आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेतला जाईल.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल. महाराष्ट्र सरकारने मुंबईत होणार्‍या आयपीएल सामन्यांच्या तिकीटविक्रीवर बंदी घातली आहे. आयपीएल संदर्भामध्ये दोन भूमिका आहेत. एकतर प्रेक्षकांविना सामने होतील किंवा सामने पुढे ढकलण्यात येतील, असे विधान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. त्यामुळे सलामीचा सामना प्रेक्षकांविनाच होणार हे जवळपास निश्चित आहे. तसेच कर्नाटक सरकारनेही आपल्या राज्यात होणार्‍या लढतींना विरोध केला आहे. परंतु, असे असतानाही ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला ११ बिलियन डॉलर्सहून अधिकचा फायदा होतो.

- Advertisement -

बीसीसीआयने विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणारी बक्षिसाची रक्कम अर्ध्यावर आणली आहे. ते ही स्पर्धा वेळापत्रकानुसार घेण्यास उत्सुक आहेत. आम्ही आयपीएल ठरल्याप्रमाणेच सुरु करण्यास उत्सुक आहोत आणि त्यासाठी सामने प्रेक्षकांविना घ्यावे लागले तरी चालेल. चाहत्यांना सामने टीव्हीवर पाहता येतील. चाहते आणि खेळाडू सुरक्षित राहणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह!
भारतात करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता खबरदारी म्हणून केंद्र सरकारने परदेशी नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आहेत. परदेशी खेळाडूंना बिझनेस व्हिसा मिळतो. त्यामुळे त्यांनाही व्हिसासाठी १५ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागू शकेल. मात्र, बीसीसीआयने केंद्र सरकारला विनंती करून परदेशी खेळाडूंना स्पर्धेच्या सुरूवातीपासून खेळण्याची परवानगी मिळवावी, असे आयपीएलमधील संघांचे म्हणणे आहे. आयपीएलमध्ये जवळपास ६० परदेशी खेळाडू खेळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -