घरक्रीडाUEFA EURO : क्रिस्तिआनो रोनाल्डोची विक्रमाशी बरोबरी; पोर्तुगाल, फ्रान्स युरो स्पर्धेच्या बाद...

UEFA EURO : क्रिस्तिआनो रोनाल्डोची विक्रमाशी बरोबरी; पोर्तुगाल, फ्रान्स युरो स्पर्धेच्या बाद फेरीत

Subscribe

पोर्तुगालला या सामन्यात दोन पेनल्टी मिळाल्या आणि या दोन्हीचे रोनाल्डोने गोलमध्ये रूपांतर केले.

कर्णधार क्रिस्तिआनो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे पोर्तुगालने युएफा युरो २०२० स्पर्धेत फ्रान्सविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत राखला. यंदाच्या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी पोर्तुगालला हा सामना किमान बरोबरीत राखणे गरजेचे होते आणि ते त्यांनी केले. पोर्तुगालला या सामन्यात दोन पेनल्टी मिळाल्या आणि या दोन्हीचे रोनाल्डोने गोलमध्ये रूपांतर केले. रोनाल्डोसाठी ही कामगिरी खास ठरली. या दोन गोलमुळे त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोनाल्डोने आतापर्यंत १७८ सामन्यांत १०९ गोल केले असून इराणच्या अली दाईच्या नावेही १०९ गोल आहेत. त्यामुळे बाद फेरीत त्याला हा विक्रम मोडण्याची संधी मिळेल.

बेंझेमाचा पाच वर्षांहूनही अधिक काळानंतर गोल

पोर्तुगाल आणि फ्रान्स या दोन्ही संघांना स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. या सामन्यात पोर्तुगालला ३० व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ज्यावर रोनाल्डोने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, मध्यंतराआधी फ्रान्सला मिळालेल्या पेनल्टीचे करीम बेंझेमाने गोलमध्ये रूपांतर करत फ्रान्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. हा आंतरराष्ट्रीय गोल करण्यासाठी बेंझेमाला पाच वर्षांहूनही जास्त काळ वाट पाहावी लागली. परंतु, त्यानंतर त्याने दुसरा गोल दोन मिनिटांनंतरच केला. मात्र, ६० व्या मिनिटाला रोनाल्डोने पुन्हा पेनल्टीवर गोल केल्याने हा सामना २-२ असा बरोबरीत संपला.

- Advertisement -

गोरिट्झकाचा गोल; जर्मनीची आगेकूच 

सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना लियॉन गोरिट्झकाने केलेल्या गोलमुळे जर्मनी आणि हंगेरी यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत संपला. त्यामुळे जर्मनीने स्पर्धेत आगेकूच केली असून उप-उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यापुढे इंग्लंडचे आव्हान असेल. हंगेरीविरुद्धच्या सामन्यात जर्मनीकडून काय हावेत्झ आणि गोरिट्झका यांनी गोल केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -