घरक्रीडाज्येष्ठ क्रिकेटपटू क्रिकेटर सुधीर नाईक यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ क्रिकेटपटू क्रिकेटर सुधीर नाईक यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

मुंबई : आयपीएलच्या (IPL) 16व्या पर्वाची देशभरात उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना क्रीडाप्रेमींसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे दिग्गज आणि मराठमोळे क्रिकेटर सुधीर नाईक (Sudhi Naik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुधीर नाईक काही दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरी पडले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र, मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली. नाईक यांनी बुधवारी (5 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगी आहे.

- Advertisement -

चौकार मारणारे पहिले फलंदाज
सुधीर नाईक हे भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौकार मारणारे पहिले फलंदाज ठरले होते. नाईक यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी इंग्लंड विरुद्ध एडजबस्टन इथे कसोटी पदार्पण केले. त्यांची कसोटी कारकीर्द फारशी मोठी नव्हती. पण त्यांनी खेळलेल्या 3 कसोटींमधील 6 डावात 141 धावा केल्या होत्या. यावेळी 77 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. तसेच सुधीर नाईक यांनी 2 एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यांनी 13 जुलै 1974 रोजी एकदिवसीय सामन्यात पदार्पण करताना पहिला चौकार मारत मोठा कारनामा केला होता.

मुंबई क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठित व्यक्ती
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सुधीर नाईक यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही नाव कमावले आहे. नाईक यांनी 85 प्रथम श्रेणी सामने खेळताना 139 डावात 4 हजार 376 धावा केल्या होत्या. यामध्ये 7 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश होता, तर 200 नाबाद ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. विशेष बाब म्हणजे नाईक हे मुंबई क्रिकेट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 1970-71 च्या हंगामात रणजी करंडक जिंकला. सुनील गावसकर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई आणि अशोक मांकड यांसारख्या मोठे खेळाडू नसताना मुंबईने रणजी करंडक विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्या काळात नाईक यांच्या नेतृत्वाचे खूप कौतुक झाले.

- Advertisement -

वानखेडे स्टेडियमचे मुख्य पीच क्युरेटर
क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतरही नाईक क्रिकेटपासून दूर गेले नाहीत. त्यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे मुख्य पीच क्युरेटर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सामन्याला साजेशी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी ही पीच क्युरेटरची असते. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. या सामन्यासाठी सुधीर नाईक यांनी खेळपट्टी तयार केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -