Women’s IPL : महिला आयपीएल ठरेल भारतासाठी फायदेशीर – स्मृती मानधना

सुरुवातीला पाच-सहा संघांमध्ये ही स्पर्धा खेळली जाऊ शकते.

smriti mandhana
महिला आयपीएल ठरेल भारतासाठी फायदेशीर - स्मृती मानधना

भारतामध्ये महिला क्रिकेटची लोकप्रियता आता वाढत आहे. तसेच प्रतिभावान महिला क्रिकेटपटू आता पुढे येत आहेत. त्यामुळे पाच-सहा संघांचा समावेश असलेली महिलांची इंडियन प्रीमियर लीग (Women’s IPL) स्पर्धा खेळवण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मत भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने व्यक्त केले. पुरुषांचे आयपीएल सुरु झाले, तेव्हा जितकी राज्ये होती, तितकीच आतासुद्धा आहेत. परंतु, आता खेळाचा दर्जा वाढला आहे. त्यामुळे महिला आयपीएलचाही विचार झाला पाहिजे. आपल्याकडे पुरेशा महिला क्रिकेटपटू आणि राज्य आहेत. माझ्या मते, आपण पाच-सहा संघांची महिला आयपीएल स्पर्धा सुरु करू शकतो, असे मानधना म्हणाली.

सुरुवातीला पाच-सहा संघ योग्य

पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे. महिलांची आयपीएल स्पर्धाही कालांतराने आठ संघांमध्ये खेळली जाऊ शकेल. मात्र, सुरुवातीला पाच-सहा संघांमध्ये ही स्पर्धा आयोजित करणे जास्त योग्य ठरेल, असे मानधनाला वाटते. महिलांच्या आयपीएलमध्ये सुरुवातीलाच आठ संघांचा समावेश करता येणार नाही. सुरुवातीला तरी पाच-सहा संघांमध्ये ही स्पर्धा खेळली जाऊ शकते. या स्पर्धेला सुरुवात होत नाही, तोपर्यंत आपल्या महिला क्रिकेटपटूंना सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार नाही, असे मानधनाने सांगितले.

स्पर्धा लवकरच सुरु होईल अशी आशा

मी तीन-चार वर्षांपासून बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. सुरुवातीची ही स्पर्धा आणि आताची स्पर्धा यात खूप मोठा फरक आहे. ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी ४०-५० महिला क्रिकेटपटू उपलब्ध असतात. हीच गोष्ट भारतीय क्रिकेटमध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. महिला आयपीएल स्पर्धा भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे ही स्पर्धा लवकरच सुरु होईल अशी मला आशा असल्याचे मानधना म्हणाली.


हेही वाचा – लॉर्ड्सवरील दमदार कामगिरीचा क्रमवारीत सिराजला फायदा