पुन्हा येरे माझ्या मागल्या !

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

भारतीय अ‍ॅथलिट्सनी चिनी, जपानी अ‍ॅथलिट्सना हरवून पहिला नंबर मिळवलाय, पदकतालिकेत पहिला नंबर मिळवलाय हे दृश्य प्रत्यक्षात जेव्हा समस्त भारतीयांनी पाहिलं, तेव्हा आपण स्वप्नात तर नाही ना? असा भास त्यांना झाला. साध्या-भोळ्या भुवनेश्वरवासियांना तर देवाला साकडं घालून अ‍ॅथलिट्स जिंकताहेत याचं फारच अप्रूप वाटू लागलं होतं! परंतु, अ‍ॅथलेटिक्सप्रेमी मात्र, मूळ रांची येथे भरणार्‍या स्पर्धा ऐनवेळी भुवनेश्वरला कशा हलवल्या गेल्या? आणि त्या पार पाडण्यासाठी कशी धावपळ करावी लागली? त्या आठवणी विसरू पाहत होते! जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सॅबेस्टियन को यांनी जेव्हा समाधानाची मोहोर या खेळांवर उठवली, तेव्हा कुठे सार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि मग सारे अ‍ॅथलेटिक्सप्रेमी खुशीत आले होते! त्या स्पर्धा शर्यतींत भारताने तब्बल २९ पदकं मिळवल्यावर आनंदाने सार्‍यांना अस्मान ठेंगणं झालं होतं! ही गोष्ट आहे २०१७ ची!

पुढच्याच वर्षी जकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्येही भारतीय अ‍ॅथलेटिक्स चमूने तब्बल १९ पदकं मिळवल्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्सविश्वात आनंदच आनंद होता. वरील स्वप्नील चित्रात ग्यानबाची मेख ही होती की अनेक देशांनी आपले सर्वोत्तम अ‍ॅथलिट्स २०१७ साली झालेल्या भुवनेश्वराच्या स्पर्धा शर्यतींत पाठवलेच नव्हते! त्यामुळे भारतीय अँथलिट्सना तुलनेने जिंकणं सोप्प गेलं. थोड्याफार फरकाने वरील प्रकारची पुनरुक्ती २०१८ सालच्या जकार्ता एशियाडमधे सुद्धा झाली. दरम्यानच्या काळात लंडन येथे भरलेल्या २०१७ सालच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतींत भारतीय चमू हात हलवीत परत आला. परंतु, एशियाडमधील कामगिरीमुळे पुन्हा आनंदाची लाट पसरली. त्यानंतर नीरज चोप्राची भालाफेकीत उंचावणारी कामगिरी, धरून अय्यासामी (४०० मी. हर्डल्स) आणि एम. श्रीशंकर (लांब उडी) सारख्या तरुण व तडफदार अ‍ॅथलिट्सची चांगली होत चाललेली कामगिरी, असं सारं काही छान जुळून येत असतानाच भारतीय अ‍ॅथलेटिक्सचमूच्या कामगिरीला अचानक ग्रहण लागल्यासारखं झालं.

’दोहा’ स्पर्धा शर्यतींच्या तोंडावर विक्रम ऐकू येण्याऐवजी दुखापतींच्या बातम्या भारतीय अ‍ॅथलेटिक्सप्रेमींना ऐकाव्या लागल्या. नीरज चोप्रा (भालाफेक), मनजीतसिंग (८०० मी.), धरून अय्यासामी (४०० मी. हर्डल्स) आणि एम. श्रीशंकर (लांब उडी) हे अ‍ॅथलिट्स दुखापतग्रस्त असल्याचे समजले. मात्र, असे असतानाही प्रमुख प्रशिक्षक बहादुरसिंग यांनी २० पदकांची अपेक्षा व्यक्त केली आहे. खरी गोम तिथेच आहे. धावताना, वेगात कमी-जास्तीचा फेरफार करून इंग्लंडच्या मो फराहपाठी धावून कसं दमायला झालं, ते भुवनेश्वरला २ सुवर्ण मिळवणार्‍या गोविंदनला ५००० आणि १०००० मीटरच्या शर्यतीदरम्यान (लंडन) चांगलंच समजलं. हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत असताना आणि ती जागतिक पातळीवर अनुभव मिळवीत असताना तिच्याच वयाची बहारीनची साल्वा नासेर ही अ‍ॅथलिट ४०० मीटरमध्ये कसं रौप्य पटकावून गेली ते ही हिमाने (लंडनमध्येच) अनुभवलं! इतकंच नव्हे तर २०१८च्या एशियाडमध्ये हिमाच्या प्रत्येक सुवर्ण टप्प्यात साल्वाच अडसर बनली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये ३००० मी. स्टीपलचेस स्पर्धेत ललिता बाबरने केलेला भारतीय विक्रम अजून कायम असला तरी त्याचवेळी ३००० मी. स्टीपलचेसमधे झालेल्या जागतिक विश्वविक्रमात बरीच घट झालेली सुधासिंगने पाहिली.

एक आणि दोन फेर्‍यांच्या म्हणजे ४०० आणि ८०० मीटर शर्यती धावणार्‍या महंमद अनस आणि जिनसन जॉन्सन यांनी जागतिक पातळीवर धावताना दुसर्‍या-तिसर्‍या फेरीपर्यंतच मजल मारली आहे. थोडक्यात सांगायचं तर ’पुन्हा येरे माझ्या मागल्या’ या स्थितीतून जाणं हे काही भारतीय अँथलिट्सना अजून टळलेलं नाही! आता हे सारं आठवायचं कशासाठी? या प्रश्नांची दोन उत्तरे देता येतील. एक तर यावेळी सगळे देश आपले तगडे चमू दोहा येथे होणार्‍या स्पर्धा शर्यतींत उतरवणार आहेत. (जे बर्‍याच वर्षांनी घडतंय!) आणि मुख्य म्हणजे यावेळी ऑस्टेलिया आणि न्यूझीलंडसह १२ नव्या देशांचे अँथलिट्स दोहा येथील स्पर्धा शर्यतींत उतरणार आहेत. भारतीय अ‍ॅथलिट्सच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं म्हणजे या स्पर्धा शर्यतींत सुवर्ण मिळवणार्‍या अ‍ॅथलिट्सना जागतिक स्पर्धा शर्यतींत थेट प्रवेश मिळणार आहे. चांगल्या कामगिरीच्या जोरावर आपलं जागतिक सीडींगदेखील वाढवायचा प्रयत्न करता येणार आहे. त्यामुळे भारताबाहेरील स्पर्धाशर्यतीत ऐनवेळी कच खाणारा भारतीय चमू कशी कामगिरी करतो? याकडेच सार्‍या भारतीय अँथलेटिक्सप्रेमींचं लक्ष असेल.

त्यावेळची भारताची झेप तर पहा (भुवनेश्वर २०१७)
भारत : १२ (सुवर्ण)- ०५ (रौप्य)- १२ (कांस्य) = २९
चीन : ०८-०७-०५ = २०
कझाक : ०४-०२-०२ = ०८
कतार : ००-०६-०१ = ०७ [पंधरावा]
जपान : ००-०५-०९ = १४ [सोळावा]

२०१७ मधील सर्वोत्तम भारतीय कामगिरी विश्वविक्रमी कामगिरी

४०० मी .महंमद अनस ४५.७७ सेकंद वेड-व्हेन-निकर्क (द. आ.) ४३.०३सेकंद
१५००मी. अजयकुमार ३:४५.८५ हिश्याम अल गरूज(मोरोक्को)-३:२६.००
५०००मी. गोविंदन १४:५४.४८ केनेनीसा बेकेले (इथी) १२:३७.३५
१००००मी. गोविंदन २९:५५.८७ केनेनीसा बेकेले (इथी)२६:१७.५३
भालाफेक नीरज चोप्रा ८५.२३ मी. यान झेलेझनी (झेक)९८.४८मी.
४*४०० पुरुष संघ ३:०२.९२ अमेरिकन संघ २:५४.२९
४००मी. निर्मला ५२.०१ सेकंद मारिता कोच (पू.ज.) ४७.६० सेकंद
१५००मी. चित्रा ४:१७.९२ गेंझेंबे दिबाबा (इथी) ३:५०.०७
स्टीपलचेस सुधासिंग ९:५९.४७ रूथ जिबेट (बहारिन ) ८:५२.७८
गोळाफेक मनप्रीत कौर १८.२८मी. नतालिया लिसोवस्काया (र) २२.६३मी.
४*४०० महिला संघ ३:३१. ३४ रशियन महिला संघ ३:१५.१७
हेप्टाथलॉन -स्वप्ना बर्मन ५९४२ गुण जॅकी जॉयनर केरसी (अमे)७२९१ गुण

– उदय ठाकूरदेसाई