मी सेहवागचा विक्रम मोडावा असे युवराजला वाटत होते!

रोहितने सांगितला पहिल्या द्विशतकाचा किस्सा

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेच द्विशतक होते. त्यानंतर त्याने आणखी दोन द्विशतके लगावण्याची करामत केली आहे. रोहितने आपले पहिले द्विशतक झळकावले तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर (नाबाद २००) आणि विरेंद्र सेहवाग (२१९) यांच्यानंतर तिसरा फलंदाज होता. रोहित त्या सामन्यात बाद झाला तेव्हा काही चेंडू शिल्लक होते. त्यामुळे त्याला सेहवागचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडता आला असता असे युवराज सिंग आणि इतर काही खेळाडूंना वाटत होते. याबाबतची आठवण त्याने रविचंद्रन अश्विनशी बोलताना सांगितली.

मी पहिले एकदिवसीय द्विशतक बंगळुरुत केले. मी बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतलो तेव्हा काही जण मला म्हणाले की, तू आणखी एक षटक खेळपट्टीवर राहिला असतास, तर कदाचित सेहवागचा विक्रमही मोडला असतास. इतर खेळाडूंना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तीन किंवा चार जणांना मी आणखी १०-१५ धावा कराव्या असे वाटत होते. युवी (युवराज सिंग) त्यांच्यापैकी एक होता आणि बहुदा शिखर धवनचाही त्यांच्यात समावेश होता, असे रोहित गमतीत म्हणाला.

२०१३ साली चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने १५८ चेंडूंत १२ चौकार आणि तब्बल १६ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी केली होती. त्याने आपल्या डावाची सुरुवात संथ गतीने केली होती. त्याने आपले शतक ११४ चेंडूंत पूर्ण केले. मात्र, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवत पुढील १०० धावा अवघ्या ४२ चेंडूंत केल्या. त्याच्या २०९ धावांच्या खेळीमुळे भारताने ५० षटकांत ३८३ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाचा डाव ३२६ धावांत आटोपला आणि भारताने हा सामना ५७ धावांनी जिंकला.

अखेर विक्रम मोडलाच!
रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाहून अधिक द्विशतक झळकावणारा (३) एकमेव फलंदाज आहे. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांवर बाद झाल्याने त्याला विरेंद्र सेहवागचा (२१९) सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडण्यात अपयश आले. मात्र, पुढच्याच वर्षी त्याने हा विक्रम मोडला. रोहितने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये २६४ धावांची उत्कृष्ट खेळी करत एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. तसेच त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच नाबाद २०८ धावा केल्या होत्या.