नवरदेवच्या कारच्या धडकेत 12 महिला जखमी

वरातीत नाचताना घडली घटना

उल्हासनगरात लग्नाच्या वरातीत नृत्य करणार्‍या महिलांना नवरदेवाच्या कारने धडक दिल्याने 12 महिला चिरडल्या गेल्या असून या पैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. उल्हासनगर येथील शांतीनगरच्या प्रवीण हॉटेल समोर एका लग्नाची वरात नवरदेवाच्या कार समोर वाजत गाजत निघाली होती. दरम्यान कारच्या चालकाचा पाय एक्सीलेटरवर पडल्याने कारसमोर डान्स करणार्‍या 12 ते 15 महिला चिरडल्या गेल्या. यात जखमी झालेल्या महिलांना जवळच्या मीरा हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यात तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस पथकासह घटना स्थळी दाखल झाले. यातील कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.