घरठाणेठाण्यातील रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू

ठाण्यातील रस्ते सफाईचे नवीन पर्व सुरू

Subscribe

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईचे नवीन पर्व शुक्रवार १ सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू झाले. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता पातलीपाडा येथील सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन त्रिकोणी झाडू, कचरा वाहून नेण्यासाठी नवीन डबे यांची पूजा केली. त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला  आणि मग सगळे सफाई कर्मचारी त्यांच्या हद्दीतील रस्ते सफाईच्या कामासाठी रवाना झाले. सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागरूकता यातून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला. पातलीपाडा येथील हजेरी शेड येथे आयुक्त बांगर यांच्यासह अतिरीक्त आयुक्त  प्रशांत रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपयुक्त तुषार पवार उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या हजेरी शेड येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली, ओवळा येथे नवीन गट सुरू करण्यात आला.

रस्ते सफाईच्या दोन्ही वेळांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदार यांची राहील. हजेरी शेड वरील उपस्थिती आणि प्रत्यक्ष कामावर असलेले कर्मचारी यांचा दैनदिन अहवाल स्वच्छता निरीक्षक यांनी वरिष्ठांना पाठवला पाहिजे, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. तसेच, रस्ते सफाईची कामे रोज सकाळी सहा वाजता सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी  सहा वाजण्यापूर्वीच हजेरी शेडमध्ये उपस्थित राहणे , उपस्थितीची नोंद करणे अनिवार्य आहे. एखाद्या हजेरी शेडवर कर्मचारी उशिरा येतात किंवा अनुपस्थित राहतात असे निर्दशनास आले तर त्याची प्रथमत: जबाबदारी कंत्राटदाराची राहील. वारंवार असे होत राहिले तर संबंधित स्वच्छता निरिक्षक आणि इतर अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. सर्व हजेरी शेडवर कर्मचारी वेळेत येता की नाही हे पाहण्यासाठी लवकरच बायोमेट्रीक  उपस्थिती प्रणाली व्यवस्था केली जाणार आहे.
नवीन बदलानुसार देण्यात आलेला त्रिकोणी झाडू वापरताना काही अडचणी येतात का, त्याचा आकार वाढवला तर अधिक सोपे होईल का, याचा सफाई कर्मचारी यांच्याकडून प्रतिसाद घेवून आवश्यक ते बदल केले जावेत. तसेच, २० सप्टेंबरपर्यंत टप्याटप्याने सर्व कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे गणवेश बदलले जातील हे सुनिश्चित करावे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाणे महापालिका क्षेत्रात साफ सफाईसाठी महापालिकेच्या सेवेतील सफाई कर्मचारी आणि कंत्राटदारांकडून नेमलेले सफाई कर्मचारी कार्यरत असतात. ०१ सप्टेंबरपासून नवीन कंत्राट सुरू झाले आहे. स्वच्छतेचा दर्जा चांगला असावा यासाठी संबंधित कंत्राटांमध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू होईल आणि ८.३० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई केली पूर्ण होईल. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जातील. त्यानंतर, दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे. सकाळी मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते सफाई होईल. तर दुसऱ्या पाळीमध्ये बाजार, व्यावसायिक आस्थापना, उशिरापर्यंत वर्दळ सुरू असलेला विभाग येथे सफाई केली जाणार आहे. शाळेचे मार्ग, सकाळी फेरफटका मारण्यासाठी वापरले रस्ते रात्रीच स्वच्छ होतील अशी यात व्यवस्था केली जाणार आहे.

वेळेत रस्ते साफसफाईची कार्यवाही सुरू करणे व सर्व रस्ते दररोज स्वच्छ होतील हे सुनिश्चित करणे, यासोबतच रस्ते सफाईच्या दर्जामध्ये आमूलाग्र वाढ करणे आवश्यक आहे, असे निरिक्षण आयुक्त बांगर यांनी नोंदवले. एखादा रस्ता साफ केल्यावर काही वेळा त्यावर कमी जास्त प्रमाणात कचरा पडलेला दिसतो. ही बाब योग्य नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक सर्व बाबी अत्यंत प्राधान्याने मार्गी लागाव्यात यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. ही बाब सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यापर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभागाने पोहोचवावी, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.
रस्ते स्वच्छतेबद्दल नागरिकांचा प्रतिसाद ही महत्वाचा आहे. त्यासाठी विभागवार नागरिकांचे गट तयार करता येतील. तसेच, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर, दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या प्रथम इशारा द्यावा नंतर दंडाची कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले.

- Advertisement -

सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद
पातलीपाडा येथील हजेरी शेड येथे आयुक्त बांगर यांनी सफाई कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. हातमोजे वापरताना काही अडचणी येतात का? त्याचा उपयोग होता का असे विचारल्यावर, घाण काढताना, गवत काढताना हातमोजे उपयोगी पडतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. उपस्थितीबद्दल, पगाराच्या वेळेबद्दलही आयुक्तांनी विचारणा केली. तसेच, नवीन जोमाने काम करा, सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागरूकता यातून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ मोहिमेला मिळेल बळ, ठाणे अधिकाधिक स्वच्छ दिसेल, असे आयुक्त म्हणाले. सर्व कामगारांचे पगार वेळेत झाले पाहिजेत, तसेच प्रत्येक हजेरी शेडवर कामगार संख्या, गटाचे नाव, कंत्राटदार याचे नाव सफाईच्या वेळा यांचा विभाग याचा ठळक उल्लेख करावा, अशा सूचना यावेळी आयुक्त बांगर यांनी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -