Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे बारावीच्या निकालाचा आलेख चढता नाहीतर उतरताच

बारावीच्या निकालाचा आलेख चढता नाहीतर उतरताच

Subscribe

 ठाणे जिल्ह्याचा निकाल ३.७७ टक्क्यांनी घसरला कोकण विभागात ठाणे पालघर नंतर तिसऱ्या क्रमांकावर, यंदाचा निकाल ८८.९० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षीही बारावीच्या निकालात मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारून हुशारी पुन्हा: एकदा दाखवून दिली आहे. मात्र या वर्षी निकालाचा आलेख चढता न राहता तो उतरताच राहिला. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.६७ टक्के इतका लागला होता. मात्र. यंदाच्या वर्षी या निकालात ३.७७ टक्क्यांची घसरून ८८.९० टक्के निकाल लागला आहे. त्याशिवाय यंदा कोकण विभागात ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असून गतवर्षाचा दुसरा क्रमांक यंदा पालघर जिल्ह्याने पटकावला आहे. तर रायगड जिल्हा प्रथम क्रमाकांवर कायम राहिला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल हा ८८.९० टक्के लागला आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील ९९ हजार १७० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८७ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४४ हजार ८९६ मुलांचा तर, ४२ हजार ८५३ मुलींचा समावेश आहे. यंदाच्या वर्षीच्या निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९२.९३ टक्के निकाल लागला आहे. या शाखेतून ३३ हजार ९८३ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ८९.२४ टक्के इतका लागला. या शाखेतून ४८ हजार ८६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ४३ हजार ४१४ विद्याार्थी उत्तीर्ण झाले. तर, कला शाखेचा निकालही ७८.५५ टक्के लागला असून या शाखेतून १५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ११ हजार ९७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

ग्रामीण क्षेत्रात मुरबाड तालुका आघाडीवर
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत निकालामध्ये आघाडीवर घेतली आहे. मुरबाड तालुक्यातील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.८९ टक्के इतके आहे. या क्षेत्रातून २ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ हजार ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित १२९ विद्यार्थी नापास झाले आहेत. यापाठोपाठ कल्याण ग्रामीण, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्याचा नंबर लागत आहे.

महापालिका क्षेत्रात मीरा भाईंदरची बाजी
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील महापलिका क्षेत्रात भाईंदर महापलिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालामध्ये बाजी मारली असून विद्याार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.४९ टक्के इतके आहे. या क्षेत्रातून ७ हजार ५१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६ हजार ८४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या पाठोपाठ ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली आणि शेवटी उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांचा नंबर लागत आहे.

- Advertisement -

ग्रामीण क्षेत्राचा तालुका निहाय निकाल (टक्केवारीत)
तालुका               उत्तीर्ण मुले     उत्तीर्ण मुली    एकूण
कल्याण ग्रामीण     ८९.९१          ९३.९७       ९१.४४
अंबरनाथ              ८३.१९          ८९.४४       ८६.२६
भिवंडी                 ८२.६८          ९२.१७        ८६.९९
मुरबाड                 ९५.९०          ९७.८८        ९६.८९
शहापुर                 ८५.९८           ९३.७४       ८९.९१

महापलिका निहाय्य निकाल (टक्केवारीत)
शहर                 उत्तीर्ण मुले     उत्तीर्ण मुली  एकूण
ठाणे                   ८८.५३          ९१. ९८      ९०.१८
नवी मुंबई             ८७.९०          ९१.४९      ८९.५७
मिरा भाईंदर          ९०.१३          ९३.०२       ९१.४९
कल्याण- डोंबिवली  ८४.९१         ८९.५५      ८७.०८
उल्हासनगर          ८३.३६          ८९.१५      ८६.१२
भिवंडी                ८५.५२          ९२.३५       ८८.९९

- Advertisment -