उल्हासनगर पालिकेचे सहायक आयुक्त लाचप्रकरणी निलंबित

तुषार सोनवणे यांच्याकडे पदभार

आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पालिकेचे प्रभाग समिती दोनचे सहायक आयुक्त अनिल खथुरानी यांना मागच्या महिन्यातील लाच प्रकरणात निलंबित केले आहे. त्यांच्या जागी तुषार सोनवणे यांच्याकडे सहाय्यक आयुक्तांचा पदभार सोपवण्यात आला आहे.

राजू शेरा यांची प्रभाग समिती दोन मध्ये बांधकामे सुरू असून ती सुरू राहावीत यासाठी अनिल खथूरानी यांनी शेरा यांच्याकडे 50 हजार रुपये मागितले होते. त्यापैकी शेरा यांनी प्रथम 25 हजार रुपये खथूरानी यांना दिले होते. आणखीन 25 हजाराचा तगादा खथूरानी यांनी राजू शेरा यांच्याकडे फोनवर लावला होता. याबाबत शेरा यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यावर आणि त्यात खथूरानी यांनी राजू शेरा यांच्याकडून प्रथम 25 हजार रुपये स्वीकारल्याचे आणि फोनवर 25 हजार मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांच्या टीमने खथूरानी यांना प्रभाग समिती दोनच्या कार्यालयात अटक केली होती. याप्रकाराची दखल घेऊन आयुक्त डॉ. दयानिधी यांनी खथूरानी यांना निलंबित करून त्यांच्या जागी तुषार सोनवणे यांची नियुक्ती केली आहे.