उल्हासनगर । गोळीबारप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना शनिवारी उल्हासनगर कोर्टात हजर करण्यासाठी आणले. त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी गर्दी करुन गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच न्यायालयाच्या परिसरात गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार गायकवाड यांना शनिवारी संध्यकाळी उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. त्यावेळी त्यांचे समर्थक गुड्डुखान, मोनाशेठ, भाजपाचे निलेश बोबडे, शिला राज, सूरज खान, अंजली खामकर, विद्या त्र्यंबके, भावेश पाल, संगिता जाधव, लावण्या दळवी आणि यशोदा माडे यांनी कोण आला रे कोण आला कल्याणचा वाघ आला, गायकवाड आगे बढो हम आपके साथ है, भाजपाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त विशेष शाखा ठाणे शहर यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून या सर्व गणपत गायकवाड समर्थकांवर मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे एका आरोपीच्या समर्थनार्थ जय घोष केल्याने न्यायालयाच्या आवारात उपस्थित वकील, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.