घरठाणेठाण्यात १४ ठिकाणी कोसळू शकते दरड, पालिकेने केली यादी जाहीर

ठाण्यात १४ ठिकाणी कोसळू शकते दरड, पालिकेने केली यादी जाहीर

Subscribe

यंदा पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती असलेल्या महापालिका कार्यक्षेत्रातील डोंगराळ परिसर असलेल्या मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा- मानपाडा या भागांतील १४ ठिकाणांची यादी ठाणे महापालिकेने जाहीर केली आहे. त्यानुसार त्या भागात घरे असणार्‍या नागरिकांना जाहिरातीद्वारे नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये घरे खाली करून दुसर्‍या ठिकाणी निवार्‍याची व्यवस्था करावी, असे आवाहनही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उद्भवणार्‍या विविध आपत्कालीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्याची तयारी पालिकेने केली आहे, तर महापालिकेने केलेल्या सर्व्हेत नाल्याच्या बाजूला आणि डोंगराच्या जवळ असलेल्या १४ भागांची यादी जाहीर करीत त्या त्या भागातील नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

- Advertisement -

त्यात मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली ठाणेकर जगत असल्याने आता त्यात पावसाळ्यात पुन्हा अशा प्रकारे नोटीस बजावण्याची कारवाई सुरू झाल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अशा ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती असते. मागील वर्षीदेखील अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली घरे रिकामी करून इतर ठिकाणी वास्तव्य करावे, असे आवाहनदेखील पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे, परंतु कोरोनाचे सावट असल्याने रहिवाशांनीदेखील घरे खाली करण्यास नकार दिला आहे.

या भागांत भूस्खलनाची भीती
लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रमजवळ, उपवन, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा, कळव्यात आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदिरालगत, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगर आदी भागांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -