ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट

बारवी धरणात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने ठाणे जिल्ह्यात पाणी कपात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी हा निर्णय ठाणे महापालिकेकडून कधीही घेतला जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणात सध्या ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात धरणातील पाणीसाठा ३८ टक्के होता. त्यामुळे आणखी आठवडाभर बारवी धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही तर ठाणे जिल्ह्यात पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे.

साधारण २० ते २५ टक्के पाणी कपात दर आठवड्याला करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. तरच पाण्यासाठी ठाणेकरांवर धोंडी धोंडी पाणी दे, असे गार्‍हाणे गाण्याची वेळ येणार नाही.