घरठाणे‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन 30 जुलै रोजी ठाण्यात

‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन 30 जुलै रोजी ठाण्यात

Subscribe

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन यंदा रविवार, 30 जुलै 2023 रोजी ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, अभिवाचन आदी सत्रांतून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे. अशी माहिती कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. कोकण मराठी साहित्य परिषद गेल्या तीन दशकांपासून मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे. कोमसापकडून दरवर्षी भरवण्यात येणारे जिल्हा साहित्य संमेलन यंदा ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयात सकाळी 9.30 ते सायंकाळी 7 या वेळेत संपन्न होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी असणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याबाबत कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. या साहित्य संमेलनातून आजचे साहित्य संवेदन टिपणारी आणि लिहित्या हातांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सत्रे होणार आहेत.

या पत्रकार परिषदेस शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्यासह कोमसापचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संमेलनात ‘समाजमाध्यमांवर प्रसारित होणारे साहित्य आणि त्याची प्रगल्भता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी, विवेक गिरधारी, श्रीकांत बोजेवार, नंदकुमार शिंदे आपले विचार मांडतील. तर प्रा. दीपा ठाणेकर या परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकार किरण येले यांच्या अध्यक्षतेखाली अभिवाचन सत्र, तसेच ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व गझलकार संदीप माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कवी कॅप्टन वैभव दळवी यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कवी कट्ट्याचेही संमेलनात आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनात ‘बहर’ ही स्मरणिका प्रकाशित होणार आहे. कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर आणि कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -