उद्योजकांनी मांडला पोलिसांसमोर समस्या पाढा

पोलिसांनी समस्या सोडविण्यासाठी दिला मदतीचा हात 

औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, ट्रॅफिक व पार्किंगची समस्या, माथाडी कामगारांच्या नावे काम मिळवण्यासाठी होणारा  त्रास, जबरदस्तीने स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी स्थानिक लोकांकडून होणारा त्रास ,औद्योगिक क्षेत्रात येथील संबंधित नसलेल्या बसेसच्या पार्किंगची समस्या, औद्योगिक क्षेत्रात आठवडे बाजार, डबल पार्किंग, बेवारस वाहने, देणगीसाठी येणारे लोक इत्यादी मुद्दे उद्योजकांकडून मांडत जणू समस्यांचा पाढा पोलिसांसमोर वाचून दाखवला. दरम्यान पोलिसांनी वेळीच आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबरोबर काही गरज भासल्यास तातडीने ११२ या हेल्पलाईन नंबर संपर्क करावा. याशिवाय सायबर सुरक्षा संबधी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील पोलिसांनी केले.

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ठाणे शहर पोलीस  आयुक्तालय व ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने १४ मार्च रोजी वागळे इस्टेट येथील टिसा हाऊस येथे एका बैठकीचे पोलीस आयुक्त जय जीत सिंग, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या पुढाकाराने आयोजन केले होते. यावेळी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी कार्यक्रमा विषयी विस्तृत माहिती दिली. तर कार्यकारी सदस्य ए वाय अकोलावाला यांनी  वागळे इस्टेट व ठाणे शहरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त अमरसिंग जाधव यांनी वागळे आणि श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील माथाडी कामगारांची मिटींग घेवुन त्यांना सूचना देण्यात येतील. वस्तू विकत घेण्यासाठी त्रास देणाऱ्या लोकांना नोटीस देण्यात येणार आहे. तसेच कंपन्यामध्ये बिट मार्शल, पेट्रोलींगची वाहने वाढविण्यात येणार आहे. सण उत्सवाचे दरम्यान मंडळाचे पदाधिकारी कंपन्यांमध्ये वर्गणी मागण्यासाठी येतात तेव्हा स्वेच्छेने वर्गणी देवु शकतात. जर कोणी व्यक्ती जबरदस्ती करीत असेल तर त्याचे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तर पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, यांनी कंपनीच्या मेनगेटवर दोन्ही बाजुला गेटसमोरील पुर्ण रस्ता चित्रीत होईल अशा रितीने उच्च प्रतीचे नाईट व्हिजन कॅमेरे लावणेबाबत सुचना दिल्या. तसेच उदयोजकांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल संबंधीत पोलीस ठाण्यात जावुन तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच पोलीस मदतीकरीता ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करण्याबाबत तसेच सायबर क्राईमचे अनुषंगाने कंपनीमध्ये पोलीस विभागाकडून जनजागृती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले. तसेच शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त वेरणेकर यांनी औदयोगिक क्षेत्रामध्ये डबल पार्किंग करणारे वाहनांवर कारवाई करण्याबाबत तसेच औदयोगिक क्षेत्रातून होणाऱ्या स्कुल बस चे वाहतुकीबाबत संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तसेच अंबरनाथ येथे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध नसल्याने तेथे होणारे खाजगी वाहतूक करणारे वाहन धारक अतिरिक्त भाडे घेत असल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. या बैठकीस  पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, अमरसिंग जाधव, सहायक पोलीस आयुक्त  अशोक राजपुत, ठाणे खंडणी विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे,  श्रीनगर पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काबाडी, तसेच ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्षा सुजाता सोपारकर, उपाध्यक्ष भावेश मारू, कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे,चेअरमन देवेन सोनी, उमेश तायडे आदी ६० ते ७० उदयोजक उपस्थित होते.