कल्याणात हळदी समारंभात हवेत फायरिंग

तीन जणांवर गुन्हा दाखल

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका हळदी समारंभात नाचताना रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात महिलेचाही समावेश आहे.

हळदी समारंभात डीजेच्या तालावर बेभान नाचत असताना कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. मात्र पोलिसही याबाबत शांत होते. परंतु हवेत फायरिंग करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कल्याण पूर्वेत हा चर्चेचा विषय ठरला जाऊ लागला. यामुळे कोळसेवाडी पोलिसांनी या वायरल व्हिडिओची सत्यता पडताळण्याचे काम सुरू केले.

या व्हिडिओमध्ये रिव्हॉल्व्हर घेऊन नाचताना हवेत फायरिंग केल्याचे स्पष्ट झाले. हवेत फायरिंग करणाऱ्यांविरोधात  रिव्हॉल्व्हर लायसन्स रद्द करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कल्याणचे सहायक पोलिस आयुक्‍त उमेश माने पाटील यांनी दिली. अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे तपास करीत आहेत.