घरठाणेपीक कर्जावर सहा टक्के व्याज

पीक कर्जावर सहा टक्के व्याज

Subscribe

जाचक अटीमुळे बळीराजा संतप्त

शहापूर । पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण असताना सरकारच्या नवीन आदेशाद्वारे सहा टक्के व्याजासह वसुली करण्यात यावी, असे जिल्हा बँकेला निर्देश आल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सेवा सहकारी संस्थे मार्फत कर्जाची उचल करून शेती करतात आणि मार्च अखेर शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेण्यासाठी उसनवारी किंवा कष्टाने बनवलेले दाग दागिने गहाण ठेवून व्याज वाचवण्यासाठी ती परतफेड करत असतात. परंतु या वर्षी सेवा सहकारी संस्थानी सहा टक्के व्याजदराने मुद्दल रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हा बँकेने सहकार विभागाचा दाखला देत दिले आहे, त्यामुळे मुदतीत पीक कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सहा टक्के व्याजदराचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

शेतकर्‍यांमध्ये सरकार विरुद्ध प्रचंड संतापाचे वातावरण पसरले असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी खरीप पीककर्ज मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना तीन टक्के केंद्र शासन आणि तीन टक्के डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत असे एकूण सहा टक्के तीन लाख मर्यादेच्या पीक कर्जासाठी व्याज सवलत दिली जात होती, परंतु 13 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयाकडून व्याज सवलत योजनेचे निकष बदलून सहा टक्के व्याजासह वसुली करण्यात यावी असे निर्देश जिल्हा बँकेला देण्यात आले.या निर्णयाचा आधार घेऊन जिल्हा बँकेने सेवा सहकारी संस्थांना व्याजासह वसुली करण्याचे परिपत्रक जारी केले. जे शेतकरी व्याज भरणार नाही त्यांचे हमीपत्र लिहून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन परिपत्रक जारी करण्यापूर्वी ज्या शेतकर्‍यांनी पीककर्जाची मुद्दल भरली आहे, त्यांना पुढील हंगामात वाटप होणार्‍या कर्जातून सहा टक्के व्याज दराने वसुली करण्यात यावी, व्याजासकट मुद्दल रकमेची वसुली भरल्याशिवाय शेतकर्‍यांचे कर्ज खाते निरंक होणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. पीक कर्जावर लावलेल्या व्याजाला विरोध होत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला असताना भरलेले व्याज डिबिटीद्वारे सहा महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे शासनाने सुचविले असून त्यावर शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -