ठाकुर्ली उड्डाण पुलावरील जोडरस्त्याचे काम रखडले

जोडरस्त्याच्या मार्गातील 150 घरे बाधित होणार

ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होवून तो वाहतुकीस खुला झाला आहे. मात्र याच पुलावरून एक मार्गिका कल्याणच्या दिशेने थेट रेल्वे समांतर 90 फुटी रस्त्याला जोडली जाणार आहे. ठाकुर्ली जुने रेल्वे फाटका पर्यंत या मार्गीकेचे काम झाले आहे. मात्र हा पूल जिथे उतरविण्यात येणार आहे. त्या मार्गात संतवाडी व म्हसोबा नगरातील जवळपास 150 घरे अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हा रस्ता रखडला आहे. केडीएमसीने उड्डाण पुलाच्या जोडरस्त्याची जमीन संपादनाकरिता त्या झोपडपट्टीवासियांना नोटीसा बजावल्या आहेत. मात्र पुनर्वसन न करता कारवाई करण्यास या झोपडपट्टीवासियांनी विरोध केला आहे. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूल ते 90 फुट रस्ता जोडणारा मार्ग कधी पूर्ण होणार? असा सवाल केला जात आहे.

कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम 24 वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. या रस्त्यासाठी जमीन संपादन करण्यात अनेक वर्षे गेली. तरीही अजूनही हा रस्ता पूर्णत्वास जावू शकला नाही. सुरुवातीच्या काळात पत्रीपूल ते ठाकुर्ली स्टेशन आणि ठाकुर्ली स्टेशन ते डोंबिवली स्टेशन असा दोन टप्प्यात रस्ता करण्याचे प्रयोजन होते. दरम्यानच्या काळात ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्याचे नियोजन झाले व त्याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला.या रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी खुला देखील झाला. त्यामुळे कोपर रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी झाला.
ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून कल्याणकडे जाणार्‍या वाहनांसाठी 90 फुट रस्त्यापर्यंत एक नवी मार्गिका तयार करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र केडीएमसीची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने या कामासाठी एमएमआरडीएने अर्थसहाय्य केले आहे.आता त्या मार्गीकेचे ठाकुर्ली रेल्वे फाटकापर्यंत काम झाले आहे. मात्र त्यापुढे ही मार्गिका 90 फुट रस्त्याला जोडली जाणार आहे,त्या मार्गात संतवाडी व म्हसोबा नगर झोपडपट्टी अडथळा ठरत आहे. केडीएमसीने या मार्गीकेसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी त्या झोपडपट्टीवासियांना नोटीसा बजावल्या. संतवाडी व म्हसोबा नगर ही वस्ती सुमारे 40 वर्षे जुनी आहे.

आपली घरे या प्रकल्पात बाधित होणार असल्याने येथील रहिवासी भयभीत झाले होते. या राहिवासियांनी चोळेगावातील ठाकरे गटाचे शिवसेना शाखाप्रमुख सचिन जोशी यांच्या मार्फत शहरप्रमुख विवेक खामकर आणि संघटक तात्यासाहेब माने यांची भेट घेतली. शहराचा विकास करताना जुने रहिवासी बेघर होता कामा नयेत,त्यांचे आधी पुनर्वसन करावे, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी केडीएमसी आयुक्त डॉ. दांगडे यांची भेट घेवून आपले गार्‍हाणे मांडले. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी देखील केडीएमसी आयुक्त डॉ.दांगडे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. संतवाडी व म्हसोबा नगर झोपडपट्टीधारकांना घराच्या बदल्यात बीएसयुपी योजनेंतर्गत जवळपासच सर्व सुख-सोयींनी युक्त घर देऊन या सर्व रहिवाशांचे पुनर्वसन लवकर करण्यात यावे,अशी भूमिका घेतली. पुनर्वसनाखेरीज कोणत्याही रहिवाशाला बाधित करता येणार नसल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याने बाधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.