आता ‘नाका तिकडे शाखा’ सुरु करा

राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला  

 कधी काळी मनसेचे दोन आमदार व २७  नगरसेवक निवडून आणणाऱ्या कल्याण डोंबिवलीत  मनसे पक्षाला पुन्हा पूर्वीचे वैभव आणण्यासाठी व आता पालिकेत सत्तेत वाटेकरी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. आता  ‘नाका तिकडे शाखा’ अशी नवी संकल्पना अंमलात आणा, एकत्र जमून पक्ष वाढीसाठी व जनसेवेसाठी चर्चा करा ,असा सल्ला देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना डोंबिवलीत दिला.

गेले चार दिवस राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोमवारी त्यांनी डोंबिवलीचा दौरा केला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. सर्वेश हॉल मध्ये झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी मनसैनिकांशी संवाद साधला. ज्या वाॅर्डमध्ये शाखा नसतील तिकडे मनसैनिकांनी एकत्र येऊन ‘नाका तिकडे शाखा’  अशी संकल्पना अंमलात आणा. मनसैनिकांनी एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी व जनतेची कामे कशी करता येतील यावर चर्चा करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

  राज ठाकरे यांनी दुपारी पै फ्रेंड्स लायब्ररीत भेट दिली. त्यावेळी पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै यांनी राज ठाकरे यांना आदान प्रदान प्रदर्शन, बुक स्ट्रीट, लिम्का रेकॉर्ड या विषयी माहिती दिली.राज ठाकरे यांनी इंग्रजी मराठी आणि बाल साहित्य दालन सर्व पुस्तकांची पाहणी केली.यात राज ठाकरे यांना लहान मुलांच्या पुस्तकांच्या दालनाने  आकर्षित केले.मुलांचे मासिकं पाहताना  ‘ठकठक’, मुलांचे मासिक, अमर चित्र कथा ही मासिकं त्यांनी चाळली.राज ठाकरे यांनी या वाचनालयाचे कौतुक केले.

या दौऱ्याच्या वेळी मनसेचे आमदार राजू पाटील ,जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर, डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, माजी नगरसेविका सरोज भोईर,  संदीप (रमा) म्हात्रे, श्रीकांत वारंगे आदीसह अनेक पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.