अपघातात एक ठार तर एक जखमी

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवर भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकी कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या दोन रिक्षा आणि एक चारचाकी कार धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान विवियाना मॉल समोरील रस्त्यावर घडली. या विचित्र अपघातात रिक्षाचालक अभिमन्यू अर्जुन प्रजापती (३२) यांचा मृत्यू झाला असून दुसरे रिक्षाचालक वकील अहमद अन्सारी(४०) हे जखमी झाले आहेत. तर धडक देणाऱ्या कारचा चालक अपघातानंतर कार सोडून पळून गेला आहे. या अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले आहे.

मोहमद अहमद यांच्या मालकीची कार घेऊन त्यावरील अनोळखी चालक हा बुधवारी रात्री ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरून जात होता. त्याने विवियाना मॉल समोर आल्यावर रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या दोन रिक्षा आणि एका चारचाकी कारला पाठी मागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी  राबोडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली.  घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक लोकांनी अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी जवळील जुपिटर हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी बाळकुम पाडा नंबर ०३ येथील अभिमन्यू प्रजापती या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर वकील अन्सारी हे जखमी झाली असून त्यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.