घरठाणेमुंबई, ठाणे महानगरातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या समस्या लोकसभेत

मुंबई, ठाणे महानगरातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या समस्या लोकसभेत

Subscribe

या एसी लोकलचा काय फायदा- खासदार श्रीकांत शिंदे

गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे लोकार्पण झाल्याने खा.डॉ .शिंदे यांनी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाचे आभार मानले .तसेच नवीन मार्गीकेवरून एसी ऐवजी नॉन एसी लोकल जादा चालवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी. त्याचप्रमाणे रेल्वेच्या जमिनींवर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्या झोपड्या हटविण्याची कारवाई करू नये ,अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अधिवेशनात केली. यावेळी त्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई उपनरीय रेल्वे सेवा, रेल्वे विषयक विकास कामे आणि लाखो प्रवाशांच्या समस्या व मागण्या याकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

नुकत्याच कार्यान्वित झालेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांवरुन एसी लोकल चालविण्यात येत आहेत. एसी लोकलचे भाडे सेकंद क्लास प्रवास भाड्याच्या १० पट अधिक तर फस्ट क्लास पेक्षा दुप्पट असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे .या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना भाडे परवडणारे नसल्यामुळे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचा खऱ्या अर्थाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांना काहीच फायदा होत नाही. उलट अनावश्यक या एसी रेल्वे सेवांचा खर्चा भार पडत आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरु केलेल्या एसी लोकल रेल्वे सेवेचे भाडे कमी करावे तसेच जास्तीत जास्त फेऱ्या या नॉन एसी लोकल रेल्वे सेवेच्या कराव्यात. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत असलेल्या या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवण्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशी देखील मागणी देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

- Advertisement -

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई सह देशभरातील रेल्वे जमिनींवरील अनधिकृतपणे राहत असलेल्या लाखोंनी नागरिकांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने या जमिनी तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा धाडण्यात आल्या. गेली ४० ते ५० वर्षे व त्याहूनही अधिक काळ या जमिनीवर राहत असलेल्या रहिवाश्यांचे पुर्नवसन न करता वाऱ्यावर सोडता येणार नाही . त्यासाठी नुकतीच मुंबई मध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मुंबई महानगर प्रदेश विभागातील खासदार आणि आमदारांनी भेट घेतली.

यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रितपणे योजना राबवून या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी मान्य करत तोपर्यंत या रहिवाशांना जमिनी रिकाम्या करण्यासाठी नोटीसा पाठवू नये ,ही मागणी रेल्वे राज्यमंत्र्यांनी मान्य केली. तरीही पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून या रहिवाशांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याकडे खा.डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधले. जोपर्यंत या रहिवाशांच्या पुर्नवसनाचा मार्ग सुटत नाही, तोपर्यंत कुठलीही कारवाई करु नये, अशी मागणी यावेळी रेल्वे मंत्री तसेच रेल्वे राज्य मंत्री यांच्याकडे पुन्हा एकदा केली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे रखडलेल्या पनवेल – कर्जत मार्गाचे काम लवकर करावे, २०१९ मध्ये भूमिपूजन देखील झालेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरु असून या कामाला गती देत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. तसेच कळवा – ऐेरोली उन्नत मार्ग प्रकल्पात येत असलेल्या जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया लांबली आहे. डिएफसीसी कॉरिडॉर या प्रकल्पामध्ये ज्याप्रमाणे नागरिकांना इतरत्र जागा देण्याऐवजी पैश्यांमध्ये मोबदला देण्यात आला .तोच पर्यायचा कळवा – ऐेरोली उन्नत मार्ग आणि इतर प्रकल्पांमध्ये वापरल्यास प्रकल्पसाठीचे जमिन अधिग्रहण लवकर पूर्ण होऊन प्रकल्पांचे काम देखील मार्गी लागेल, अशी सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

दिवा – वसई मार्गावर मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तेथे रेल्वे सेवा वाढवण्यात यावी . कल्याण – बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांसाठी जमिन अधिग्रहणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन कामाला गती द्यावी.कोकण रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा द्यावा .तसेच सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या रेल्वे प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाचे काम खुपच संथ गतीने सुरु असून हे काम जलद गतीने पूर्ण करावे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -