बंडाचा शिवसेनेला फरक पडणार नाही

माजी आमदार भोईर यांचा विश्वास, शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा

Subhash Bhoir Appointment as the Liaison Head of Kalyan Lok Sabha

शिवसेनेने अनेक हिवाळे, पावसाळे बघितले. अनेक बंडखोरांनी शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रयत्न केला. मात्र तो कधीही यशस्वी झाला नाही. आताही झालेल्या बंडाचा काडीमात्र फरक पडणार नाही. आता संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. विजय हा सत्याचाच होणार आहे, असा विश्वास कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख, माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण पूर्वेत शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्या प्रमुख आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

कल्याण पूर्वेतील महाड तालुका मराठा समाज सेवा संघ हॉलमध्ये निर्धार मेळावा झाला. यावेळी जिल्हा महिला संघटक विजया पोटे, राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, रमेश जाधव, आशा रसाळ, राधिका गुप्ते, शीतल मंढारी, रजवंती मढवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाष भोईर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थपणे पुढे नेत आहेत. सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शिवसेनेत आजवर दोन-तीन वेळा बंडखोरी झाली, पण शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आणि वाढलीही. कोणी कितीही वल्गना केल्या तरी शिवसेनेवर कब्जा करायची कुणाचीही हिंमत नाही, असा इशारा सुभाष भोईर यांनी दिला. तर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अतिशय सोज्वळ आणि शांत आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सर्व अधिकार दिले होते. असे असतानाही शिंदे यांनी केलेली बंडखोरी शिवसैनिकांना रुचलेली नाही. मी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे की मी मरेपर्यंत शिवसेनेतच रहाणार.

उद्धव साहेबांबरोबर असताना एकनाथ शिंदेचा फोन
मातोश्रीवर उद्धव साहेबांसोबत बसलो असताना एकनाथ शिंदे यांचा फोन आला. हे कळताच उद्धव साहेब दुसर्‍या खोलीत निघून गेले. परत येऊन हे पण विचारले नाही एकनाथ शिंदे काय बोलत होते. म्हणजे आमचा साहेब किती सोज्वळ असल्याचे महानगरप्रमुख विजय साळवी यांनी सांगितले. दरम्यान या निर्धार मेळाव्यात कल्याण पूर्वेतील आम आदमी पार्टीच्या काही महिला पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.