घरठाणेनाममात्र दरात पुन्हा उपलब्ध होणार समाजमंदिरे, व्यायामशाळा

नाममात्र दरात पुन्हा उपलब्ध होणार समाजमंदिरे, व्यायामशाळा

Subscribe

महासभेत ठराव मंजूर

ठाणे शहरातील एकमेव भाजप आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळाच्या सभागृहात शहरातील व्यायामशाळा, समाजमंदिरे हे किमान नाममात्र दरात न देता, रेडीरेकनर दरानुसार द्यावे, अशी लक्षवेधी मांडल्यानंतर महापालिका हद्दीतील वास्तु रेडीनेकर दरानुसार देण्यास सुरुवात झाली. पण दुसरीकडे गुरुवारी पार पडलेल्या महापालिकेच्या शेवटच्या महासभेत भाजप नगरसेवकांनी समाजमंदिरे आणि व्यायामशाळा किमान नाममात्र दरात मिळावी अशी मागणी केल्यावर ठराव मांडण्यात आला.

तसेच त्या ठरावाला भाजप नगरसेवकांनी पाठींबा दर्शवल्याने ते आमदारांपेक्षा ‘लय’ भारी ठरले आहेत. याचदरम्यान, शिवसेना नगरसेविका रागिनी बैरीशेट्टी यांनी मागील पाच वर्षात आमच्या प्रभागात असलेल्या समाज मंदिराचा लाभ केवळ एकाच नगरसेवकाला मिळाला आहे, असे का? असा सवाल उपस्थित करून शिवसेनेच्या इतर सदस्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महासभा सुरू झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका कविता पाटील यांनी या मुद्याला हात घालत, समाज मंदिर किंवा व्यायामशाळा या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी पूर्वी किमान नाममात्र दरातच या वास्तु संस्थांना उपलब्ध करुन दिल्या जात होत्या. आमदार, नगरसेवक यांच्या निधीतून या वास्तु उभारल्या जात होत्या. परंतु त्या नाममात्र दरात देण्यात येऊ नये यासाठी विधीमंडळात एका लोकप्रतिनिधीने लक्षेवधी मांडली होती असे सांगितले.

त्यामुळेच या वास्तु रेडीरेकनर दरानुसार देण्याच निश्चित करण्यात आले. त्यामुळे या वास्तु घेण्यास संस्था पुढे येत नाही. तर या वास्तुंची देखील दुरावस्था झाली. परंतु कोणत्या लोकप्रतिनिधीने ही मागणी केली होती. असा सवाल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. परंतु महापौर पुन्हा राजकारण करता असे बोलले जाईल त्यामुळे नाव सांगणे उचित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु हाच मुद्दा धरुन राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आमदार संजय केळकर यांनीच तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात हा मुद्दा उपस्थित करुन त्याची लक्षवेधी मांडली असून त्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते, असा टोलाही त्यांनी लगावला. याचदरम्यान काहीसा गोंधळ सभागृहात झाला. अखेरीस या वास्तु किमान नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लावल्यानंतर त्या संदर्भातील ठराव केल्यावर त्याला भाजप नगरसेवकांनी पाठींबा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -