घरठाणेमुरबाड रेल्वेसाठी वेगवान निर्णय

मुरबाड रेल्वेसाठी वेगवान निर्णय

Subscribe

राज्य सरकारचे हमी पत्र तत्काळ रेल्वे बोर्डाकडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी 50 टक्के खर्च उचलण्याची हमी देणारे पत्र राज्य सरकारने केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांनंतर मंगळवारी तत्काळ रेल्वे बोर्डाला पाठविले. या पत्रामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाची लवकरच निविदा काढली जाणार असून, मुरबाडच्या विकासासाठी हा क्रांतीकारक निर्णय आहे. दरम्यान, राज्य सरकारने हमी दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर भविष्यात हा मार्ग माळशेज घाट व नगरपर्यंत पोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच या निर्णयाने आता खर्‍या अर्थाने नाना शंकरशेठ यांच्या गावात रेल्वे पोचणार आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकारने 50 टक्के खर्च उचलावा, अशी मागणी 2019 मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावेळी त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, अडीच वर्षांत निर्णय घेतला गेला नव्हता. या संदर्भात काल कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 50 टक्के खर्चाला हमी देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला तत्काळ उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानुसार राज्य सरकारच्या गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव आर. एम. होळकर यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठविले आहे. त्यात 50 टक्के खर्चाची हमी घेतली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्य सरकारने रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने 50 टक्के खर्चाची शाश्वती दिल्यामुळे आता निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. निविदा मंजूर झाल्यानंतर कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम केवळ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची तयारी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दर्शविली. भविष्यात मुरबाडहून माळशेज घाट आणि माळशेज घाटातून नगरपर्यंत रेल्वेमार्ग नेण्याचा निर्धार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नाना शंकरशेठ यांच्या गावात रेल्वे पोचणार
भारतीय रेल्वेचे प्रवर्तक म्हणून नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. मुरबाड हे आदरणीय नानांचे मूळ गाव आहे. मात्र, या गावापर्यंत रेल्वे नसल्याची कपिल पाटील यांच्याबरोबरच मुरबाडकरांना खंत होती. श्री. कपिल पाटील यांनी खासदार झाल्यापासून कल्याण-मुरबाड रेल्वेचा ध्यास घेतला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमितभाई शाह यांच्याबरोबरच तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल, विद्यमान मंत्री अश्विजी वैष्णव यांना पटवून दिले. त्यानंतर मुरबाड रेल्वेला हिरवा कंदिल मिळून, तब्बल सात दशकांपासून कल्याण-मुरबाड रेल्वेची मागणी पूर्ण झाली. आता नाना शंकरशेठ यांच्या गावापर्यंत रेल्वे पोचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -