घरठाणेनालेसफाईची कामे 15 एप्रिलपासून सुरू करा- आयुक्त सौरभ राव

नालेसफाईची कामे 15 एप्रिलपासून सुरू करा- आयुक्त सौरभ राव

Subscribe

ठाणे । नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 15 एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदार्‍या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले.

या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, 15 एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.
त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील 86 अती धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अदययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली.

- Advertisement -

आपत्कालीन कक्षाला भेट
बैठकीनंतर, ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणार्‍या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली.

टीडीआरएफची पाहणी
हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -