लोकार्पण सोहळ्यानंतरही गावदेवी भूमिगत वाहनतळ सुरू करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

 स्टेशन परिसरात वाहन पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने गावदेवी मैदानाखाली भूमिगत वाहनतळ हा महत्वकांक्षी प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे महापालिकेने हाती घेतला. त्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ मार्च रोजी लोकार्पणही झाले. मात्र लोकपर्ण सोहळा होऊन ही ते वाहन तळ सुरू करण्यासाठी पहिली १० मार्च. त्यानंतर १३ मार्च तारीख बॅनर वाहनधारकांना दिली गेली. परंतु, १३ मार्चला देखील अजून ते वाहन तळ सुरू झालेले नसल्याने वाहनधारकांमार्फत नाराजी व्यक्त केली जात आहे. जर वाहन तळाचे काम पूर्णच झाले नव्हते तर लोकपर्णाची लग्नीन घाई कश्याला केली. असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांशी करार झाल्यावर दोन ते तीन दिवसात ते वाहन तळ सुरू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून ‘तारीख पे तारीख’ असाच खेळ वाहन तळासाठी सुरू असल्याचे दिसत आहे.
गावदेवी भुमीगत पार्कींग प्लाझाचे काम ७०० चौरस मीटरवर करण्यात आले आहे. त्यानुसार याठिकाणी १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी शुल्क लागणार असून, स्टेशनजवळील हे पहिलेच भुमिगत पार्कींग ठरले आहे. यासाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरम्यान हे पार्कींग प्लाझा केव्हा सुरु होणार यावरुन याठिकाणी आंदोलन देखील झाली आहेत. अखेर याचे काम पूर्ण झाल्यानंतर ४ मार्च रोजी ठाण्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण करीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भुमीगत वाहन तळाचेही लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क होऊन या भागातील कोंडी दूर होईल असे वाटत असतांनाच, आजपर्यंत या ठिकाणी एकही वाहन पार्क होऊ शकले नसल्याची माहिती पुढे आली आहे. याठिकाणी आजही पार्कींगला टाळेच असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने संबधींत ज्या एजन्सीला काम दिले  आहे. त्यांच्याकडून सुरक्षा अनामत रक्कम भरण्यात आलेली नव्हती. ती रक्कम सोमवारी भरण्यात आली. त्यानुसार आता करारनामा केला जाईल आणि पुढील दोन ते तीन दिवसात ते वाहन तळ सुरु होईल असे सांगण्यात येत आहे.
असे असतील पार्किंगचे दर
याठिकाणी दुचाकी वाहन पार्कींगचे पहिल्या दोन तासासाठी १० रुपये आकारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते चार तासासांठी त्यात पाच रुपये वाढ होईल. तर त्यापुढील तासासांठी देखील पाच रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय चारचाकी वाहनांसाठी पहिल्या दोन तासांसाठी २५ रुपये आणि त्यापुढील दोन ते चार तासांसाठी अतिरिक्त ५ रुपये आणि चार तासापुढे अतिरिक्त १० रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय नाईट पार्कींगची सुविधा देखील येथे उपलब्ध असल्याने त्याचे महिन्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ओव्हर नाईट शुल्क १ हजार रुपये आकारले जाणार आहे.