घरठाणेमुरबाड मधील आबाल वृद्धांचा जीव धोक्यात घालून डोली प्रवास सुरूच

मुरबाड मधील आबाल वृद्धांचा जीव धोक्यात घालून डोली प्रवास सुरूच

Subscribe

स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेली तरी मुरबाड तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीत येणार्या धसई गावाजवळील लोखंडेवाडी आदिवासीवाडीतील नाला पार करण्यासाठी आजही डोली वापरावी लागते. या नाल्यावर येण्या-जाण्यासाठी साकव, पूल बनवलेला नाही. ठाण्याचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 फेब्रुवारी 2020 रोजी याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पूल किंवा साकव उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याविषयी विनंती पत्र दिले होते. तीन वर्षानंतरही याबाबत कुठलीही कार्यवाही सरकारी यंत्रणांकडून झालेली नसून आदिवासी ग्रामस्थांना नाला पार करण्यासाठी डोलीचाच वापर करावा लागत आहे. राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरू केली असल्याने आपल्या आदिवासी वाडीतील झोपडीवजा घरा दारी शासन कधी पोहचणार ? अशी प्रतिक्षा येथील आदिवासी ग्रामस्थांना आहे.

मुरबाड तालुक्यातील अनेक आदिवासी गावपाडे रस्ते पाणी आदी मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे पावसाळ्यात गावपाड्यांचा संपर्क तुटत आहे. त्यापैकीच एक लोखंडेवाडी आहे. या वाडीची लोकसंख्या 150 आहे. ही पूर्णपणे आदिवासी वस्ती आहे. वाडीतील ग्रामस्थांंना गरजा भागवण्यासाठी चार किमी अतंरावरील धसई बाजारपेठेत ये-जा करावी लागते. वाडीलगतचा नाला उन्हाळ्यातही भरून वाहत असतो. पावसाळ्यात तर नाल्याला पूर आल्यासारखी स्थिती असते. लोखंडेवाडीतल्या वृद्ध, गरोदर महिला, लहान मुलांना एखाद्या आपत्काळात रुग्णालयात नेताना आणताना मोठ्या कापडाची अशी ‘डोली’ करून खांद्यावरून न्यावी लागते.

- Advertisement -

बारा वर्षापूर्वी 2011 ला याच वाडीतील रुपाबाई भाऊ वाघ (45) या महिलेस रात्री सर्पदंश झाला. या नाल्याला पूर आला होता. त्यामुळे नाला पार करण्यासाठी नाल्याची पाणी कमी होण्याची प्रतिक्षा करण्यावाचून पर्याय नव्हता. यामुळे या महिलेला वेळेवर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालय, दवाखाना गाठता आला नाही आणि तीचा मृत्यू झाला. थील एक युवक धनाजी वाघ हा सन 2016 पासून या वाडीलगतच्या नाल्यावर पूल व्हावा म्हणून जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात पाठपुरावा करत आहे. परंतु त्यांच्या पदरीही निराशाच येत आहे. महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री ठाण्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना या नाल्यावर पूल किंवा साकव साकारण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यांना समस्या सांगितली होती. ग्रामस्थांनी वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. त्यावेळी याविषयी एकनाथ शिंदे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासकीय मान्यता देण्याविषयी पत्रही दिले होते. परंतु आजतागायत याबाबत पुढील कार्यवाही झालेली नाही आणि पूल अजूनही साकारण्यात आलेला नाही. हा पूल किंवा साकव उभारण्याविषयी जिल्हा परिषदेच्या नियोजन सभेत ठराव झाला होता, त्यालाही चार वर्षे झाली. परंतु कार्यवाही झाली नाही. या वाडीत विद्यार्थी, लहान मुले, रुग्ण, वृद्ध आहेत. आपत्काळात जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास हा पूल किंवा साकव खूप गरजेचा आहे. त्यामुळे नाल्यावरील हा पूल कधी होणार याची प्रतिक्षा ग्रामस्थांना आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -