फेरीवाल्यांच्या हक्काच्या जागेचा प्रश्न सुटला

होळीनंतर महत्वाची बैठक

महापालिकेने एक हजार ३६७ फेरीवाल्यांची यादी अंतिम केली. त्यामुळे शहरातील फेरीवाले धोरण प्रत्यक्षात उतरताना दिसू लागले आहे. राहिला मुद्दा आता फेरीवाल्यांच्या जागेचा प्रश्न, नोंदणी शुल्क आणि त्यांच्या कमिटीच्या निवडणुकीचा व इतर बाबींसाठी बैठक घेण्याचा तर, ही बैठक ही होळीनंतर घेण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. एकदा ही बैठक झाल्यावर कमिटी निश्चित झाल्यावर ती मान्यतेसाठी कामगार आयुक्तांकडे पाठवली जाईल. त्याचबरोबर फेरीवाल्यांना हक्काच्या जागेबाबत चर्चा होण्याची शक्यता अधिक असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

फेरीवाला धोरणामध्ये फेरीवाल्यांना जागा निश्चित करून त्याच ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांनी बसने अपेक्षित असताना ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी मग ते स्टेशन असो, रुग्णालय असो किंवा शाळा असो अशा अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी अनाधिकृतपणे आपले बस्तान मांडले आहे. हे फेरीवाले केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर ठाण्याच्या बाहेरील कुर्ला, भिवंडी, असे बाहेरचे फेरीवाले येऊनही आपला व्यवसाय करत आहेत. २०१९ मध्ये ठाणे महापालिकेने जो सर्व्हे केला त्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ ६ हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ २ हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करण्यात फेरीवाल्यांची संख्या १ हजार ३६७ एवढी निश्चित झाली आहे.

दरम्यान आता मागील काही वर्षे फेरीवाला समितीची बैठक न झाल्याने फेरीवाला धोरण अंतिम होऊ शकले नव्हते. परंतु आता होळीनंतर म्हणजे पुढील आठवड्यात ही बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. या बैठकीत फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्याबरोबर कमिटीची निवड करणे, त्यातील सदस्य कोण कोण असतील त्यावर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय फेरीवाल्यांसाठीचे नोंदणीकृत शुल्क कीती असावेत, त्यात काही बदल करण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतुक पोलीस, स्थानिक फेरीवाला समितींचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हे फेरीवाला धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच फेरीवाला कमिटी अंतिम झाल्यानंतर ती कामगार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे. एकूणच येत्या काही दिवसात फेरीवाला धोरण निश्चित होऊन फेरीवाल्यांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. असे ही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.