Eco friendly bappa Competition
घर ठाणे काही क्षणांसाठी झाली मायलेकराची ताटातूट

काही क्षणांसाठी झाली मायलेकराची ताटातूट

Subscribe

प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली भेट

डोंबिवली । चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ट्रेन मधून प्रवास करणार्‍या कुटुंबियांनी सिग्नल लागताच उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र या घाई गडबडीत उतरताना आपल्या 3 वर्षाच्या मुलाला आधी उतरविण्यासाठी एका प्रवाशाकडे दिले. त्याचवेळी ट्रेन सुरू झाली. मूल प्रवाशाकडे राहिले आणि कुटुंबीय ट्रेन मध्ये राहिले. मुलाची ताटातूट झाल्याने घाबरलेल्या कुटुंबियांनी कोपर स्थानकातील लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी तो प्रवासी आपल्या मुलाला घेऊन स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात आल्याचे पाहताच आईने मुलाला मिठी मारली. ही घटना मंगळवारी दिवा ते कोपर रेल्वे स्थानकात दरम्यान घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल धनराज हे पत्नी अंजू आणि मुलगा यज्ञेश यांना घेवून मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिवा येथून आपल्या गावी रोहा येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र घाईघाईत हे कुटुंब चुकून पनवेलकडे जाणार्‍या ट्रेन मध्ये चढण्या ऐवजी वसईच्या दिशेने जाणार्‍या ट्रेनमध्ये चढले. ट्रेन सुरू झाल्यावर आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढच्या स्थानकात म्हणजे अप्पर कोपर स्थानकात उतरण्यासाठी कुटुंब दरवाजात थांबले होते. तितक्यात दिवा ते अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सिग्नल लागताच गाडी थांबली. त्यावेळी अंजू यांनी मुलासह खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला उतरता आले नाही. याचवेळी गाडीतून उतरलेल्या सह प्रवासी प्रणित जंगम याच्याकडे मुलाला खाली दिले. प्रणित तीन वर्षाच्या यज्ञेशला घेऊन खाली उतरला मात्र इतक्यात ट्रेन सुरू झाली. यामुळे आई अंजू गाडीतून उतरू शकली नसल्याने आई मुलाची ताटातूट झाली.

- Advertisement -

आपला मुलगा एका अज्ञात इसमासोबत एकटाच आहे. तो हरवणार तर नाही ना या कल्पनेने आई अंजू कासावीस झाली. इतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.आई अंजू व वडील हर्शल दोघेही अप्पर कोपर रेल्वे स्टेशनवर उतरले. धावतच मुलाचा शोध घेण्यासाठी पुन्हा दिवा गाठले. मात्र तोपर्यंत प्रणित मुलाला घेऊन रेल्वे रुळातून तासभर चालत कोपर रेल्वे स्टेशनला पोचला. त्याने रेल्वे पोलिसांसह स्टेशन मास्तरकडे जाऊन घडलेली घटना सांगितली. स्टेशन मास्तरांनी आजूबाजूच्या स्थानकात संपर्क करत ही माहिती दिली. काही वेळातच अंजू आणि तिचे कुटुंबीय कोपऱ रेल्वे स्टेशनला आले. आपल्या मुलाला पाहून अंजूचे डोळे पाणावले.तिने मुलाला मिठीत घेत तिच्यासाठी देवदूत ठरलेला सहप्रवासी प्रणितचे आभार मानले. प्रणितने दाखवलेली सतर्कता आणि प्रसंगावधान यामुळेच ताटातूट झालेल्या माई लेकाची भेट झाली. प्रणित हा नालासोपारा येथे राहणारा असून एका कुरिअर कंपनी मध्ये नोकरी करतो . दुपारी वसई ट्रेनने कोपर येथे येणार होता. मात्र त्याला झोप लागल्याने तो दिवा येथे पोहचला.त्यानंतर पुन्हा त्याच ट्रेनने कोपर येथे जात असताना ही घटना घडली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -